Naseeruddin Shah  : ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह राजकारणाच्या मैदानात उतरले आहेत. त्यांची भाची सायरा शाह हलीम यांनी आपल्या ट्विटवर नसीरुदीन शाह यांचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमधून पश्चिम बंगालमधील बल्लीगंज पोटनिवडणुकीत सायरा शाह हलीम यांना पाठिंबा देण्याचे आवाहन नसीरुद्दीन शाह यांनी केले आहे. 


नसीरुद्दीन शाह यांची पत्नी रत्ना पाठक शाह यांनीही व्हिडीओ शेअर करत सायराला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. सायरा शाह हलीम या बल्लीगंज पोटनिवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवार आहेत. तर त्यांच्या विरोधात माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो हे तृणमूल काँग्रेसचे उमेदवार आहेत. 12 एप्रिल रोजी या जागेसाठी मतदान होणार आहे. 


सायरा शाह हलीम यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, नसीरुद्दीन शाह मतदारांना सायरा यांना पाठिंबा देण्याचे आवाहन करत आहेत. "मी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसून मी फक्त सायरा शाह हलीमला पाठिंबा देण्याचे आवाहन करत आहे. मी नेहमी तिला एक धैर्यवान आणि प्रामाणिक व्यक्ती म्हणून पाहिले आहे. ती नेहमी लोकांना मदत करण्यास उत्सुक असते. शिवाय सायरा ही आमच्या हक्कांची रक्षक आहे, असे नसीरुद्दीन शाह यांनी म्हटले आहे. 






नसीरुद्दीन शाह यांनी नाव न घेता तृणमूल काँग्रेसच्या उमेदवाराचीही खिल्ली उडवली आहे. ते म्हणाले, "तुमचा प्रतिनिधी हा काळजी घेणारा, दयाळू आणि वचनबद्ध व्यक्ती असावा.तो प्रतिनिधी तुमच्यासाठी काम करेल. तुम्हाला संधीसाधू आणि समाजामध्ये द्वेष पसरवणारा नेता आवडणार आहे का?"


नसीरुद्दीन शाह यांची पत्नी रत्ना पाठक शाह यांनी म्हटले आहे की, "सायरा ही आशा आणि भविष्य आहे. तिला आपले मत द्या, मला आशा आहे की आम्ही तिच्यासाठी रॅली काढू आणि देशातील तरुणांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी तिला मदत करू"


दरम्यान, बालीगंज पोटनिवडणुकीची लढत सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. सुब्रत मुखर्जी यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. ही जागा जिंकण्यासाठी नेत्यांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे.     


महत्वाच्या बातम्या