चेन्नई : उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती बाळगल्याप्रकरणी शिक्षा सुनावलेल्या शशिकला नटराजन यांना आत्मसमर्पणासाठी वेळ देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळं शशिकला यांना लवकरच तुरुंगाची वारी करावी लागणार आहे.
शिक्षा सुनावल्यानंतर पोलिसांसमोर हजर होण्यासाठी शशिकला यांनी वेळ देण्याची मागणी केली होती. पण, सुप्रीम कोर्टाने वेळ देण्यास नकार दिल्याने, त्यांना आज आत्मसमर्पण करावं लागणार आहे.
उत्पन्नाहून अधिक संपत्ती बाळगल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने शशिकला यांना काल चार वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसंच त्यांना दहा कोटींचाही दंड ठोठवण्यात आला होता. त्यामुळे आता शशिकला यांची तुरुंगात रवानगी होणार हे निश्चित झालं.
या निर्णायानंतर शशिकला आता दहा वर्षांपर्यंत निवडणूक लढवू शकणार नाहीत. परिणामी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री होण्याचं शशिकला यांच स्वप्न तूर्तास तरी लांबणीवर पडलं आहे.
दरम्यान, शिक्षेचा निकाल आल्यानंतर काहीच वेळात त्यांनी पन्नीरसेल्वम यांची पक्षातून हकालपट्टी केली. त्यांच्याजागी ई.पलानीसामी यांची पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे.