डेहराडून : उत्तराखंड विधानसभेसाठी आज मतदान होत असतानाच योगगुरु बाबा रामदेव यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. "या निवडणुकीत मी 'निष्पक्ष' आहे," असं बाबा रामदेव म्हणाले. "तसंच या निवडणुकीतील निकाल अनपेक्षित असतील. भल्याभल्यांना पराभव पत्करावा लागेल," अशी भविष्यवाणीही रामदेव बाबांनी केली.

हरिद्वारमध्ये बाबा रामदेव म्हणाले की, "या निवडणुकीत मोठी राजकीय उलथापालथ होईल." विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे बाबा रामदेव यांनी यावेळी भाजपचं नाव घेतलं नाही. "मतदानादरम्यान मला कोणत्याही राजकीय पक्षाचं नाव घ्यायचं नाही," असं ते म्हणाले.

यंदाच्या निवडणुकीत मी 'निष्पक्ष' असून कोणालाही समर्थन नसल्याचं रामदेव बाबा म्हणाले. याबाबत 'एबीपी न्यूज'सोबत बोलताना त्यांनी स्पष्ट बोलणं टाळलं. "देशाची जनता हुशार आहे. ती स्वत:च निर्णय घेईल," असं ते म्हणाले. त्याआधी रामदेव बाबांनी सगळ्यांना मतदान करण्याचं आवाहन केलं. ज्यांची नियत चांगली त्यांना मत द्या, असंही ते म्हणाले.