Mission Moon Chandrayaan-3: भारताच्या चांद्रयान-3 (Chandrayaan-3) नं बुधवारी (23 ऑगस्ट 2023) चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरून इतिहास रचला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्यात यशस्वी ठरलेला भारत (INDIA) हा जगातील पहिला देश ठरला आहे. भारताच्या या यशाचं संपूर्ण जगभरातून कौतुक होत आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) च्या यशानंतर जगभरात चांद्रयान, चंद्र यांचीच चर्चा होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत चंद्रावर जमिनीची खरेदी-विक्री करणारेही काही कमी सक्रिय नाहीत, पण चांद्रयान चंद्रावर पोहोचल्यापासूनच अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. चंद्रावर जमीन खरेदी-विक्री करणाऱ्यांना खरोखरंच काही कायदेशीर आधार आहे का? चंद्रावर मानवी वसाहती स्थापित होऊ शकतात का? यांसारखे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. 


चंद्रावर जमीन खरेदी करणाऱ्यांच्या यादीत अनेक बॉलिवूड कलाकारांचीही नावं आहेत. शाहरुख खानला एका चाहत्यानं चंद्रावर जमीन भेट दिली होती. अंतराळाबाबत कुतूहल असलेला दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं 2018 मध्ये चंद्रावर जमीन खरेदी केली होती. कलाकारांनी खरेदी केलेली ही जागा चंद्राच्या 'सी ऑफ मॅक्सिवो' भागात आहे. याशिवाय अनेक सामान्य नागरिकांनीही चंद्रावर जमीन खरेदी केल्याचा दावा केला आहे. आता तुमच्या मनात प्रश्न असेल की, चंद्रावर जमीन कशी विकत घेतली जाते? आणि इथली जमीन कोण विकतंय? अशातच चंद्रावर जमीन खरेदी करणं कायदेशीर आहे की, बेकायदेशीर? यांसारख्या अनेक प्रश्नांनी सर्वसामान्यांच्या मनात काहूर माजलं आहे. 


चंद्रावर जमीन खरेदी करणं कायदेशीर की बेकायदेशीर?


10 ऑक्टोबर 1967 च्या आऊटर स्पेस ट्रीटीनुसार, चंद्रावर जमीन खरेदी करणं बेकायदेशीर आहे. आऊटर स्पेस ट्रीटी हा अवकाशातील पहिला कायदेशीर दस्तऐवज होता, जो पृथ्वीव्यतिरिक्त चंद्रावर किंवा इतर कोणत्याही ग्रहावर जमीन खरेदी करण्यास कायदेशीर परवानगी देत ​​नाही. या करारावर भारतासह 109 देशांनी स्वाक्षरी केली आहे. या करारानुसार, आऊटर स्पेसवर कोणत्याही देशाचा अधिकार नाही. यामध्ये अंतराळवीरांच्या संदर्भात असं म्हटलं होतं की, अंतराळाचा अभ्यास करणं सर्व देशांच्या फायद्याचं आहे.             


वैयक्तिक हेतूंसाठी वापरण्याची परवानगी नाही


करारामध्ये, अंतराळ हे मानवजातीसाठी एक समान वारसा म्हणून वर्णन केलं गेलं आहे. द इंडियन एक्स्प्रेसच्या 2018 च्या वृत्तानुसार, दिल्लीतील साऊथ एशियन युनिव्हर्सिटीच्या कायदेशीर अभ्यास विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. स्टेलाना जॉली यांनी स्पष्ट केलं की, सामायिक वारसा याचा अर्थ असा आहे की, त्याचा वापर कोणीही वैयक्तिक कारणांसाठी करू शकत नाही. अधिकार हे प्रत्येकासाठी आहेत. आऊटर स्पेस ट्रीटी सरकारी अवकाश संस्थांना चंद्र आणि खगोलीय पिंडांमध्ये संशोधन करण्याचा अधिकार देतं. मात्र, कोणत्याही गैर-सरकारी संस्थेला याची परवानगी नाही.


चंद्रावरील जमीन कोण विकत आहे?


जर चंद्रावर जमीन विकत घेणं खरंच बेकायदेशीर आहे. मग मोठमोठ्या सेलिब्रिटी आणि इतरही लोक चंद्रावरची जमीन खरेदी केल्याचा दावा करतायत, त्यांना जमीन विकतंय कोण? मीडिया रिपोर्ट्सनुसार, लुना सोसायटी इंटरनॅशनल आणि इंटरनॅशनल लूनर रजिस्ट्री यांसारख्या कंपन्या चंद्रावर जमीन विकण्याचा दावा करत आहेत. अनेक देशांनी यासाठी त्यांना अधिकृत केलं असल्याचा या कंपन्यांचा दावा आहे. मात्र, जगभरातील देशांनी त्यांना अधिकृत परवानगी दिल्याचा कोणताही पुरावा या कंपन्यांकडे नाही.