Chandrayaan-3 Mission: भारताची चांदोमामा म्हणजे चांद्र मोहिमेतील मैलाचा दगड असलेल्या चांद्रयान-3 आज (5 ऑगस्ट) चंद्राच्या कक्षेत यशस्वीरित्या दाखल झाले आहे. भारतीय अंतराळ संशोशन संस्था इस्रोने ट्विट करून माहिती दिली आहे. इस्रोने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “चांद्रयान-3 चंद्राच्या कक्षेत यशस्वीरित्या दाखल झाले आहे. मिशन ऑपरेशन्स कॉम्प्लेक्स (MOX), ISTRAC (ISRO टेलीमेट्री, ट्रॅकिंग आणि कमांड नेटवर्क), बेंगळुरू येथून पेरीलूनमध्ये (Perilune) येथे रेट्रो-बर्निंगची कमांड देण्यात आली होती. पेरीलून हे अंतराळयानाचे चंद्राच्या सर्वात जवळचे ठिकाण आहे.
चांद्रयानाचे आता पुढील ऑपरेशन कक्षा कमी करण्याचे असेल. हे उद्या रात्री (6 ऑगस्ट) केले जाईल, असेही ट्विटमध्ये म्हटले आहे. इस्रोने उपग्रहाकडून त्याच्या केंद्रांना संदेश देखील शेअर केला होता, ज्यात लिहिले होते, MOX, ISTRAC, हे चांद्रयान-3 आहे. मला चंद्राचे गुरुत्वाकर्षण जाणवत आहे.14 जुलै रोजी प्रक्षेपण झाल्यापासून तीन आठवड्यांत पाचपेक्षा जास्त टप्पे चांद्रयानाचे पार पडले आहेत.
अजून दोन महत्वाच्या टप्प्यांची प्रतीक्षा
चांद्रयान चंद्राच्या कक्षेत गेल्याने मैलाचा दगड पार पडला आहे, त्यामुळे इस्रोच्या कामगिरीत आणखी मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्यामुळे आजचा दिवस खूप महत्वाचा होता. सोप्या शब्दात सांगायचं झाल्यास चांद्रयानाचे दोन टप्पे असतील. येत्या 17 ऑगस्ट रोजी विक्रम लँडर वेगळे होईल आणि 23 ऑगस्टला यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल. जेव्हा चांद्रयान-3 लँडर चंद्रावर उतरेल, तेव्हा असं करणारा भारत हा जगातील चौथा देश असेल. यापूर्वी हा पराक्रम केवळ अमेरिका, रशिया आणि चीनलाच करता आला आहे. चांद्रयान-3 चे रोव्हर ज्या भागात उतरणार आहे, त्या भागावर आतापर्यंत कोणत्याही देशाचा रोव्हर नसल्याने या कामगिरीकडे देशासह संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे.
चांद्रयान मोहिमेचा उद्देश काय आहे?
चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला असला, तरी चंद्रावर उतरणे ही सुद्धा अत्यंत आव्हानात्मक प्रक्रिया असते. रोव्हर जेव्हा उतरेल तेव्हा सूर्यप्रकाश आवश्यक असतो. चंद्रावर सूर्य फक्त 14-15 दिवस बाहेर येतो. इस्रोच्या शास्त्रज्ञांनी याची तंतोतं काळजी घेतली असली तरी हे आव्हान कायम असेल. लँडरसोबत एक रोव्हर (छोटा रोबो) देखील आहे, जो चंद्राच्या पृष्ठभागाचा शोध घेईल आणि आवश्यक डेटा पृथ्वीवर पाठवेल. चांद्रयान-3 चा रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर कोणती खनिजे आहेत? हवा आणि पाण्याच्या काय शक्यता आहेत याचा शोध घेणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या