जीएसएलव्ही मार्क ३ या प्रक्षेपकाच्या मदतीने गेल्या सोमवारी पहाटे चांद्रयान 2 झेपावणार होतं. मात्र तांत्रिक कारणांमुळे लाँचिंग काऊंटडाऊनच्या जवळपास 56 मिनिट आधीच मोहीम स्थगित करण्यात आली. भारतच नव्हे तर अवघ्या जगाचं लक्ष या मोहिमेकडे लागलं होतं.
वेहिकल सिस्टममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सावधगिरीचा उपाय म्हणून चांद्रयान-2 चं लॉन्चिंग थांबवण्याचा निर्णय घेतल्याचं इस्रोने सांगितलं होतं.
आठवड्याचा विलंब का?
चांद्रयान- 2 मध्ये क्रायोजेनिक इंधन भरताना तांत्रिक बिघाड लक्षात आल्याने काऊंटडाऊन थांबवण्यात आलं. इंधन टँकमधून सगळं इंधन काढून पुन्हा तपासणीसाठी आठवडाभर वेळ गेला.
श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश संशोधन केंद्रातून अवकाशात झेपावल्यानंतर 52 दिवसांनी चांद्रयान 2 चंद्रावर पोहचेल. झेप घेतल्यानंतर हे चांद्रयान 16 दिवस पृथ्वीची परिक्रमा करणार आहे.
भारत अशा प्रकारची मोहीम राबवणारा पहिलाच देश ठरणार आहे. या मोहिमेसाठी भारताला तब्बल 978 कोटी रुपये खर्च आला आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे या यानाचे सर्व भाग स्वदेशी आहेत. या मोहिमेत चंद्रावर असलेल्या पाण्याची पातळी, चंद्रावरील जमीन, त्यावर उपलब्ध असलेली खनिजं, रसायनं आणि त्यांचा अभ्यास केला जाणार आहे.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जमिनीखाली कोणती खनिजं दडली आहेत, तिथे पाण्याचा अंश आहे का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे चांद्रयान 2 मधील रोव्हरने केलेल्या तपासणीनंतर मिळतील.
चांद्रयान 2 मोहिमेची वैशिष्ट्य काय?
- चांद्रयान तब्बल 3 लाख 84 हजार किलोमीटर अंतर पार करुन चंद्रावर पोहचणार
- चंद्रावर पोहचण्यासाठी चांद्रयान 2 ला 55 दिवसांचा कालावधी लागणार
- चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रोवर प्रज्ञान उतरेल
- चंद्रावर उतरल्यानंतर प्रज्ञान चंद्रावरची माहिती कंट्रोल सेंटरला पाठणार
चांद्रयान 2 मोहिमेतील अडचणी आणि आव्हान
- अंतराळात चंद्राच्या गतीबरोबरच चांद्रयान 2 च्या गतीवर नियंत्रण ठेवणे
- चांद्रयान 2 पृथ्वीपासून 3 लाख किमींच्या अंतरावर असल्यानं त्याच्याशी संपर्क कायम ठेवणे
- चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर रोवर आणि लँडर विक्रम उतरवणे
- चंद्रावरच्या तापमानासह धुळीचाही मोहिमेवर परिणाम होऊ शकतो