नवी दिल्ली : चंद्रकांत पाटील हे आता गुजरात भाजपचे नवे अध्यक्ष असतील. हे वाक्य ऐकल्यानंतर गोंधळात पडू नका. महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ कधी झाली अशा विचारात पडू नका. कारण हे चंद्रकांत पाटील अर्थात सीआर पाटील आहेत गुजरातचे. आज भाजपने त्यांची गुजरात प्रदेशाध्यक्षपदी निवड केली आहे.


गुजरात मध्ये 2022 मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत त्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. या नियुक्तीमुळे एकाच नावाचे दोन व्यक्ती दोन वेगवेगळ्या राज्यात एकाच पक्षाकडून प्रदेशाध्यक्ष या एकाच पदावर नियुक्त ठेवण्याचा अनोखा योग मात्र दिसतोय.





सी आर पाटील हे 2019 मध्ये लोकसभेवर तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. गुजरात मधले मोदींचे सर्वात जवळचे खासदार अशी त्यांची ओळख दिल्लीत आहे. मोदींच्या वाराणसी मतदारसंघातल्या कामावर देखरेख ठेवण्याचे काम सीआर पाटील पाहायचे. खासदारांना शासकीय बंगल्याचे वाटप करणाऱ्या हाउसिंग कमिटीवर अध्यक्ष म्हणूनही त्यांची सध्या नियुक्ती आहे. 65 वर्षांचे जीआर पाटील हे हे मूळचे जळगाव चे. 1989 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सुरुवातीला सुरत मध्ये स्थानिक पातळीवर ती वेगवेगळी पदे सांभाळली. 2009 मध्ये ते पहिल्यांदा खासदार झाले. सी आर पाटील हे मराठी व्यक्ती गुजरात भाजपची धुरा सांभाळताना दिसतील. काही दिवसांपूर्वी काँग्रेसने हार्दिक पटेल यांची गुजरात कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती केली होती. त्यामुळे गुजरातच्या राजकारणात पटेल विरुद्ध पाटील ही लढाई कशी रंगते हे पाहणं महत्त्वाचं असेल.


Chandrakant Patil on Ram Mandir | राम मंदिर आणि कोरोना वेगळे विषय, चंद्रकांत पाटलांची पवारांवर टीका