नवी दिल्ली :भारतीय राजकारणात अनेक नेते असे आहेत ज्यांना त्यांच्या राजकीय पक्षानं मुख्यमंत्री केलं. मात्र, पद गेल्यानंतर त्यांनी पक्ष सोडला किंवा पक्षाविरोधात भूमिका घेतली. सध्या चंपई सोरेन यांचं नाव चर्चेत आहे. मात्र, मुख्यमंत्रिपद सोडल्यानंतर अनेक नेत्यांचं आणि त्यांच्या पक्षाचं बिनसल्याची उदाहरणं पाहायला मिळतात. यापूर्वी जीतनराम मांझी, अमरिंदर सिंग, जगदीश शेट्टर, नारायण राणे, एनटीआर, अशोक चव्हाण, विजय बहुगुणा अशा अनेक नेत्यांचे आणि त्यांच्या पक्षांचे संबंध बिघडले किंवा अनेकांनी पक्ष बदलले.
चंपई सोरेन ते अमरिंदर सिंह कुणी पक्ष बदलले
सध्या झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते चंपई सोरेन यांनी मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर वेगळी भूमिका घेतली आहे. हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर चंपई सोरेन 2 फेब्रुवारीला मुख्यमंत्री झाले होते. मात्र, हेमंत सोरेन जामिनावर सुटल्यानंतर त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं. आता त्यांनी हेमंत सोरेन आणि झारखंड मुक्ती मोर्चाविरोधात भूमिका घेतलीय.
जीतनराम मांझी यांना मे 2014 मध्ये नितीश कुमार यांनी बिहारचं मुख्यमंत्री केलं होतं. 2015 मध्ये त्यांना पदाचा राजीनामा देण्यास पक्षानं सांगितलं मात्र, त्यांनी नकार दिला. विश्वासदर्शक ठरावात अपयशी ठरल्यानं जीतनराम मांझींना राजीनामा द्यावा लागला. यानंतर त्यांनी नवा पक्ष स्थापन केला.
पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेसच्या सरकारचं नेतृत्त्व मुख्यमंत्री म्हणून गेलं. 2017 ते 2022 दरम्यान नवजोत सिंह सिद्धू यांच्यासोबत तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. 2021 मध्ये अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रिपद सोडावं लागलं. त्यानंतर चरणजीत सिंह चन्नी मुख्यमंत्री झाले. मात्र, त्यानंतर पुढच्या काळात अमरिंदर सिंह यांनी पक्ष सोडला. आता ते भाजपमध्ये आहेत.
नारायण राणे हे शिवसेनेचे दुसरे नेते आहेत जे मुख्यमंत्री बनले. मनोहर जोशी यांनी राजीनामा दिल्यानंतर नारायण राणे यांना मुख्यमंत्री करण्यात आलं होतं. पुढं पक्षातील उद्धव ठाकरे यांचं वर्चस्व वाढत असल्याचं लक्षात येताच नारायण राणे यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पुढं त्यांनी स्वत:चा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन केला. यानंतर पुढील काळात ते भाजपमध्ये दाखल झाले.
विजय बहुगुणा हे उत्तराखंडमधील काँग्रेसच्या सरकारचे मुख्यमंत्री होते.2012मध्ये ते मुख्यमंत्री बनले होते. सरकार चालवण्यात अपयशी ठरल्यानं पक्षानं त्यांचं पद 2014 मध्ये काढून घेतलं होतं. त्यानंतर हरीश रावत मुख्यमंत्री बनले. पुढे, रावत यांचं सरकार पाडण्याचा बहुगुणा यांनी प्रयत्न केला. पुढच्या काळात ते भाजपमध्ये दाखल झाले.
अशोक चव्हाण हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडी सरकारच्या काळात दोन वेळा मुख्यमंत्री होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी ते भाजपमध्ये दाखल झाले आता ते राज्यसभेचे खासदार आहेत.
संबंधित बातम्या :