नवी दिल्ली : दिल्लीमध्ये अंमलबजावणी संचलनालय म्हणजेच ईडीच्या एका अधिकाऱ्यानं मंगळवारी रात्री जीवन संपवलं. ईडीच्या त्या अधिकाऱ्याचं नाव आलोक कुमार रंजन असं आहे. या अधिकाऱ्याचा मृतदेह साहिबाबाद येथे रेल्वे ट्रॅकवर आढळला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव खेत आलोक कुमार रंजन यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ईडीचे काही अधिकारी तिथे पोहोचले होते मात्र त्यांनी या प्रकरणावर काही बोलण्यास नकार दिला. आलोक कुमार रंजन एका कथित भ्रष्टाचार प्रकरणात ईडी आणि सीबीआयच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले होते.



ईडीचे सहायक संचालक संदीप सिंह यांना 50 लाख रुपयांची लाच मागितल्याच्या प्रकरणात सीबीआयनं 7 ऑगस्टला अटक केली होती. सीबीआयनं मुंबईतील एका ज्वेलर्सच्या  तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली होती. मुंबईतील ज्वेलर्सवर ईडीनं छापा टाकला होता. या ठिकाणी रेड टाकल्यानंतर संबंधित व्यावसायिकाच्या मुलाची देखील चौकशी करण्यात आली. यावेळी संदीप सिंह यांनी त्या मुलाला अटक न करण्यासाठी 50 लाख रुपयांची मागणी केली होती. 


संबंधित सोने व्यावसायिकानं आपल्या मुलाला ईडीच्या अटकेपासून वाचण्यासाठी पैसे देण्याची तयारी दर्शवली. त्याचवेळी त्यानं सीबीआयकडे तक्रार देखील केली. 7 ऑगस्टला सहायक संचालक संदीप सिंग यांना 20 लाख रुपये लाच घेताना सीबीआयनं दिल्लीच्या लाजपत नगर येथून अटक केली. सीबीआयनं संदीप सिंह यांच्यावर एफआयर दाखल करण्यात आली होती. ईडीनं ज्यावेळी मुंबईत  ज्वेलर्सवर छापा टाकला त्यावेळी संदीप सिंह त्या टीमचा भाग होते. 


संदीप सिंह यांची चौकशी सीबीआयनं सुरु केली होती. यामध्ये आलोक कुमार रंजन यांचं नाव देखील समोर आलं होतं. सीबीआयनं त्यांच्या एफआयरमध्ये आलोक रंजन यांचं नाव देखील घेतलं होतं.सीबीआयच्या एफआयरमध्ये नाव आल्यानं आलोक कुमार रंजन चिंतेत होते. ईडीनं देखील या प्रकरणी कारवाई सुरु केली होती. ईडीनं यापूर्वी संदीप सिंह यांना निलंबित केलं होतं. तर, सीबीआयनं मनी लाँडरिंग प्रकरणात एफआयर दाखल केला होता. 


 
लाच प्रकरणात अडकल्यानंतर सहायक संचालक संदीप सिंह यांच्यावर ईडीनं निलंबनाची कारवाई केली होती. सीबीआयनं केलेल्या एफआयरमध्ये नाव असल्यानं आलोक कुमार रंजन यांना धक्का बसला होता. आलोक कुमार रंजन यांच्यावर देखील निलंबनाची टांगती तलवार होती. या भीतीतून आलोक कुमार यांनी रेल्वेपुढं उडी मारत जीवन संपवलं दिल्ली पोलिसांकडून या प्रकरणी अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पोलिसांनी आलोक कुमार यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तर, पोलिसांनी कडून घटनेमागील कारणांचा शोध सुरु आहे. 



आलोक कुमार हे प्रतिनियुक्तीवर ईडीमध्ये कार्यरत होते. तर लाच प्रकरणात अटक करण्यात आलेले अधिकारी संदीप सिंह गेल्या महिन्यांपासून ईडीत सहायक संचालक म्हणून कार्यरत होते. संदीप सिंह यांच्याशिवाय केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ म्हणजेच सीबीडीटी तर अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क बोर्डाच्या 30 अधिकाऱ्यांना ईडीत नियुक्ती देण्यात आली होती. 


संबंधित बातम्या :


मोठी बातमी! शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपये जमा? नमो किसान योजनेचा चौथ्या हप्त्याचं वितरण


 Pune Accident : पोर्शे अपघातावेळी गाडीत दोन नव्हे तर तीन मित्र असल्याचं समोर, गायब झालेला तिसरा 'हायप्रोफाईल' तरूण कोण?