नवी दिल्ली : पश्चिम बंगालचे मुख्य सचिव अल्पन बंडोपाध्याय यांच्यावर केंद्र सरकार कठोर कारवाई करत त्यांची तात्काळ बदली केली आहे. बंगालमधून तडकाफडकी बदली करुन त्यांना 31 मे रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत भारत सरकारच्या डीओपीटीमध्ये हजर राहण्यास सांगितलं आहे. सोबतच पश्चिम बंगाल सरकारला त्यांना तात्काळ रिलीव्ह करण्यास म्हटलं आहे. त्यांची पुढील पोस्टिंग कुठे होणार हे अद्याप स्पष्ट नाही.
मुख्य सचिव आढावा बैठकीत आढावा बैठकीत उशिरा पोहोचले
'यास' चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीला अल्पन बंडोपाध्यात सुमारे अर्धा तास उशिरा पोहोचले होते आणि काही वेळ थांबल्यानंतर त्यांनी बैठकीतून काढता पाय घेतला. त्यांचं हे वर्तन सेवा नियमांच्याविरोधात असल्याचं म्हटलं जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 'यास' चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी (28 मे) पश्चिम बंगाल आणि ओदिशाच्या दौऱ्यावर होते. त्यांनी ओदिशा आणि पश्चिम बंगालच्या नुकसानग्रस्त भागाची हवाई पाहणी केली.
पंतप्रधान मोदी यांची दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह मुख्य सचिव आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत पूर्वनियोजित आढावा बैठक होती. मोदींनी काल सर्वात आधी भुवनेश्वरमध्ये ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आणि सरकारमधील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत ओदिशा आणि पश्चिम बंगालमध्ये चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. या बैठकीत केंद्र सरकारमधील मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि इतर स्थानिक नेतेही उपस्थित होते.
ममता बॅनर्जीही उशिरा पोहोचल्या आणि तातडीने निघाल्या
ओदिशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालचा दौरा केला. या दौऱ्यानंतर त्यांना बंगालमधील नुकसानीचा आढावा घ्यायचा होता. परंतु या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सुमारे अर्धा तास उशिरा पोहोचल्या. त्यांच्यासह राज्य सरकारकडून मुख्य सचिव अल्पन बंडोपाध्याय यांनाही आढावा बैठकीत सहभागी व्हायचं होतं. परंतु तेही उशिरा पोहोचले. त्यानंतर काही वेळातच मुख्यमंत्र्यांसह त्यांनीही बैठकीतून काढता पाय घेतला.
अल्पन बंडोपाध्याय यांची तडकाफडकी बदली
नियमानुसार पंतप्रधान जर एखाद्या राज्यात अशी आढावा बैठक घेत असतील तर सेवा नियमाप्रमाणे राज्याचे मुख्य सचिव किंवा त्यांच्या जागी त्याच दर्जाचे अधिकारी बैठकीत उपस्थित असणं अनिवार्य असतं. परंतु पंतप्रधानांच्या बैठकीत त्यांनी वेळेवर न पोहोचणं हे सेवा नियमांचं उल्लंघन आहे. हीच बाब लक्षात घेऊन रात्री उशिरा केंद्र सरकारच्या अपॉईंटमेंट्स कमिटी ऑफ कॅबिनेटने भारतीय प्रशासकीय सेवा (कॅडर) नियम 1954 च्या अधिनियम 6(1) चा वापर करत 1987 बॅचचे अल्पन बंडोपाध्याय यांची तडकाफडकी बदली केली. तसंच त्यांना मुख्य सचिव म्हणून सेवामुक्त करावं, असे निर्देश राज्य सरकारला दिले. सोबतच 31 मे रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत त्यांना डीओपीटीमध्ये हजर राहण्यास सांगितलं आहे.