नवी दिल्ली/कोलकाता : 'यास' चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावलेल्या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सहभागी झाल्या नाही. यावरुन भाजपने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.


'यास' चक्रीवादळाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलवलेल्या बैठकीत ममता बॅनर्जी यांनी सहभागी न होणं हे घटनात्मक मूल्य आणि सहकारी संघराज्याच्या संस्कृतीची हत्या आहे. त्यांच्या क्षुद्र राजकारणाने बंगालच्या नागरिकांना पुन्हा एकदा त्रास दिला आहे," अशा शब्दात ट्वीट करुन भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर घणाघात केला आहे.






तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही ट्विटरच्या माध्यमातून ममतांना टीकेचं लक्ष्य केलं आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "पश्चिम बंगालमधील आजचा घटनाक्रम स्तब्ध करणारा आहे. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान व्यक्ती नाही तर संस्था आहेत. दोघेही जनसेवेचा संकल्प आणि संविधानाच्या प्रति निष्ठेची शपथ घेऊन जबाबदार स्वीकारतात. नैसर्गिक संकटात बंगालच्या जनतेला मदत देण्याच्या उद्देशाने आलेल्या पंतप्रधानांसोबत असं वर्तन वेदनादायी आहे. जनसेवेचा संकल्प आणि घटनात्मक कर्तव्यापेक्षा राजकीय मतभेदांना महत्त्व देणं हे एक दुर्दैवी उदाहण आहे. यामुळे भारताच्या एकात्मतेच्या मूळ भावनेलाच धक्का देणारा आहे."






दुसरीकडे ममता बॅनर्जी यांनी यास चक्रीवादळामुळे राज्यात झालेल्या नुकसानीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काल एक अहवाल सोपवला. सर्वाधिक नुकसान झालेल्या क्षेत्रांच्या पुनर्विकासासाठी 20 हजार कोटी रुपयांची मागणी त्यांनी केली आहे. चक्रीवादळामुळे राज्याचं 20 हजार कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. दीघामध्ये आयोजित एक बैठकीनंतर त्यांनी सांगितलं की, "आम्ही दीघा आणि सुंदरबनच्या पुनर्विकासासाठी 10 हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची मागणी केली आहे. आम्हाला काहीच मिळणार नाही असंही होऊ शकतं."


'यास' चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदी पहिल्यांदा ओदिशाला गेले त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये पोहोचले. मोदींनी मदतकार्यासाठी तात्काळ 1 हजार कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. ओदिशाला तातडीने 500 कोटी रुपये दिले जातील. तर पश्चिम बंगाल आणि झारखंडसाठी आणखी 500 कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली आहे, जी नुकसानीच्या आधारावर दिली जाईल.


दरम्यान केंद्र सरकार नुकसानीचं आकलन करण्यासाठी एक पथकाची स्थापना करणार असून हे पथक राज्याचा दौरा करेल. पथकाच्या अहवालाच्या आधारावर संबंधित राज्यांना मदत दिली जाईल.


याआधी पंतप्रधानांनी चक्रीवादळात मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांची मदत तर गंभीररित्या जखमी असलेल्यांना 50 हजार रुपयांची मदत देण्याचीही घोषणा केली आहे.