नवी दिल्ली : केंद्र सरकारने ऊसाच्या एफआरपीमध्ये प्रतिक्विंटल 20 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेत देशभरातील शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आता ऊसाला प्रतिक्विंटल 275 रुपयांचा एफआरपी मिळू शकेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ऊसाच्या एफआरपीत प्रतिक्विंटल 20 रुपयांची वाढ करण्यात यावी, असा प्रस्ताव अन्न आणि ग्राहक मंत्रायलाने कॅबिनेटकडे पाठवला होता.
एफआरपीचा हा प्रस्ताव केंद्रीय कॅबिनेटने स्वीकारला आहे. त्यामुळे ऊसाच्या एफआरपीत प्रतिटन 200 रुपयांची वाढ झाली आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेला हा एफआरपी पुढील हंगामापर्यंत लागू असेल.
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुका लक्षात घेत शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून केला जात आहे. काही दिवसांपूर्वी खरीप हंगामातील पिकांच्या हमीभावात (एमएसपी) वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अनेक संघटनांनी एकत्र येत देशव्यापी आंदोलन केलं होतं. या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, स्वराज अभियानचे योगेंद्र यादव यांच्यासह इतर शेतकरी नेते सहभागी झाले होते.