मुंबई :  केंद्र सरकाविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर करण्याची विरोधकांनी दिलेली नोटीस लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी स्वीकारली आहे. लोकसभेतील संख्याबळ पाहता मोदी सरकारला धोका नसला तरीही मित्रपक्ष शिवसेना काय भूमिका घेणार, याची उत्सुकता आहे.


एनडीएतील घटकपक्ष शिवसेनेने याआधी सातत्याने सरकारवरील नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच अविश्वास प्रस्ताव मांडणाऱ्या टीडीपीच्या खासदारांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत उद्धव ठाकरेंची भेट घेत अविश्वास प्रस्तावाला पाठिंबा देण्याची विनंती केली होती.

अविश्वास प्रस्तावाबाबत अजूनही शिवसेनेची अधिकृत भूमिका समोर आलेली नाही. तसंच उद्धव ठाकरेंकडून याबाबत निर्णय घेतला गेल्याशिवाय पक्षाच्या खासदारांनी काहीही बोलू नये, अशा सूचना पक्षाकडून देण्यात आल्याची माहिती आहे.

लोकसभेत भाजपकडे पुरेसं संख्याबळ आहे. लोकसभेच्या एकूण 543 जागा आहेत. त्यातील नऊ जागा सध्या रिक्त असल्याने आत्ता लोकसभेत 534 खासदार आहेत. त्यामुळे बहुमताचा आकडा 268 वर आला आहे. लोकसभेत भाजप खासदारांची संख्या 272 असल्याने त्यांना बहुमत सिद्ध करताना अडचण निर्माण होण्याची शक्यता कमी आहे.

 दुसरीकडे, ‘आमच्याकडे संख्याबळ नाही, असं कोण म्हणतं,’ असा प्रश्न विचारत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनीही संख्याबळाचा दावा केला आहे.

दरम्यान, हे सरकार लोकांच्या प्रश्नावर अपयशी ठरलं आहे, असं म्हणत टीडीपीने लोकसभेत सरकारविरोधात अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली. या प्रस्तावाला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, सीपीएमसह अन्य विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे.