नवी दिल्ली : केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंह यांच्या पत्नीने दिल्लीतील तुघलक रोड पोलीस ठाण्यात खंडणी आणि ब्लॅकमेलिंगची तक्रार केली आहे. व्ही. के. सिंह यांच्या पत्नीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी एक टीम तयार करुन तपास सुरु केला आहे.

 

तक्रारीत काय म्हटलंय?

 

व्ही. के. सिंह यांच्या पत्नीने आरोप केला आहे की, त्यांच्या नातेवाईकच्या मित्राने त्यांचा वैयक्तिक संवाद रेकॉर्ड केला असून, काही बनावट ऑडिओ यूट्यूबवर अपलोड करण्याची धमकी देत आहे. गेल्या काही दिवसांपासून या धमक्या येत होत्या. मात्र, आता तक्रार दाखल केल्याने प्रकरण दिल्ली पोलिसांच्या दारात पोहोचलं आहे.

 

रेकॉर्डिंग लीक करण्याची धमकी, 2 कोटी रुपयांची मागणी

 

व्ही. के. सिंह यांच्या पत्नीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी खंडनी आणि धमकी प्रकरणी तक्रार दाखल करुन, तपासही सुरु केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, व्ही. के. सिंह यांच्य पत्नीने तक्रारीत म्हटलंय की, रेकॉर्डिंग लीक करण्याची धमकी देत 2 कोटी रुपयांची मागणीही केली आहे.

 

व्हिडीओ-ऑडिओमध्ये नक्की काय आहे?

 

तक्रारीनुसार, आरोपी इसम व्ही. के. सिंह यांच्या पत्नीच्या ओळखीचा आहे आणि पतीला म्हणजेच व्ही. के. सिंह यांना बदनाम करण्याची धमकीही देत आहे. यासोबतच व्ही. के. सिंह यांच्या मुलांनाही आरोपीपासून धोका असल्याचं सांगितलं जात आहे. आरोपीने तयार केलेल्या व्हिडीओ आणि ऑडिओमध्ये नक्की काय आहे, याबाबत अद्यापी कोणतीही माहिती समोर आली नाही.

 

रात्री-मध्यरात्री वेगवेगळ्या फोन नंबरवरुन फोन करुन धमक्याही आरोपी देत आहे, असा आरोपही तक्रारीत व्ही. के. सिंह यांच्या पत्नीने केला आहे.

 

व्ही. के. सिंह यांच्या पत्नीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला आहे. मात्र, प्रकरण केंद्रीय राज्यमंत्र्यांशी संबंधित असल्याने यावर बोलण्यास पोलिसांनी नकार दिला आहे.