नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या मुलीला शाळेत चिडवल्यामुळे त्यांचा राग अनावर झाला. त्यांच्या मुलीला शाळेत अपमानित केल्यामुळे भडकलेल्या स्मृती इराणींनी इंस्टाग्रामवर अत्यंत तिखट भाषेत प्रतिक्रिया दिली आहे.

या पोस्टमध्ये इराणी यांनी म्हटले आहे की, 'मी काल माझ्या मुलीसोबत टाकलेला एक सेल्फी डिलीट केला आहे.  कारण एक ए झा नावाचा मूर्ख वर्गामध्ये माझ्या मुलीच्या लूकवरुन तिला चिडवत होता. सोबतच तो त्याच्या मित्रांनाही सांगत होता की, तिच्या आईच्या इंस्‍टाग्राम पोस्‍टवर जाऊन लूकवरून तिला अपमानित करा'.


महिला, बालविकास आणि वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे की, माझ्या मुलीने मला पोस्ट डिलीट करायला सांगितल्यामुळे मी डिलीट  केली. मी तिचं ऐकलं कारण मी तिच्या डोळ्यात अश्रू नाही पाहू शकत.

पोस्ट डिलीट करण्याच्या निर्णयामुळे चुकीच्या माणसाला ताकतच मिळते, असेही त्यांनी म्हटलं आहे.  स्मृती इराणी यांनी आपल्या मुलीच्या यशाच्या गोष्टी सांगत ती स्वतः अशा गोष्टींचा सामना करेल, असेही म्हटलं आहे.

इराणींनी म्हटलं आहे की, माझी मुलगी एक चांगली खेळाडू आहे. लिम्का बुकमध्ये तिचं रेकॉर्ड नोंदलं गेलेलं आहे.  कराटेचा ब्लॅक बेल्ट आणि विश्‍व चॅम्पियनशिपमध्ये दोन वेळेला कास्यपदक मिळाले आहे. ती खूप प्रेमळ आणि खूप सुंदर आहे, असे स्मृती इराणींनी म्हटलं आहे.

तुम्ही कितीही त्रास द्या, ती सक्षमपणे सामना करेल, ती जोइश इराणी आहे आणि मला तिची आई असल्याचा अभिमान आहे, असेही स्मृती इराणींनी म्हटलं आहे.