Prime Minister Museum : राजधानी नवी दिल्लीतील (Delhi) 'नेहरु मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररीचे' नाव बदलून आता 'पीएम म्युझियम अँड लायब्ररी' करण्यात आले आहे. या संग्रहालयाच्या नामांतराचा निर्णय भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून घेण्यात आला आहे. या नामांतराच्या मुद्द्यावरुन सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे. काँग्रेसच्या विरोधानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 


राऊतांनी म्हटलं की, "या संग्रहालयात इतर पंतप्रधानांना स्थान मिळायला हवे. अनेक पंतप्रधानांनी देशासाठी योगदान दिले आहे. त्यामध्ये अटल जी, इंदिरा जी, लाल बहादुर शास्त्री यांचा सर्वांचा समावेश आहे. या सगळ्यांनी देशासाठी काम केलं आहे. त्यामुळे या संग्रहालयामध्ये इतर पंतप्रधानांच्या कामाविषयी पण माहिती मिळायला हवी. पण या संग्रहालयाचे नाव बदलण्याची काही गरज नाही."


ज्यांनी देश घडवला त्यांनाच संपवण्याचा प्रयत्न : राऊत 


ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी म्हटलं की, "पंडित नेहरुंनी देशासाठी महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात देखील योगदान दिले आहे. त्यांच्याच नावावर म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरु पीएम म्युझियम असं नाव करता आलं असतं, पण सरकारला देशाचा इतिहास मिटवायचा आहे. ज्यांनी आपला देश घडवण्यासाठी योगदान दिलं त्यांनाच संपवण्याचा प्रयत्न सध्या करण्यात येत आहे." तसेच पंडित नेहरुंबद्दल असलेल्या द्वेषामुळे हे कृत्य करण्यात आल्याचं राऊतांनी म्हटलं.


नेहरुजींसमोर मोदीजींची उंची लहान आहे : काँग्रेस


काँग्रेस नेते गौरव वल्लभ यांनी म्हटलं की, "नेहरुंसमोर मोदीजींचे व्यक्तिमत्त्व अजूनही लहान आहे. बोर्डावरुन नेहरुजींचे नाव हटवल्याने नेहरुजींचे व्यक्तिमत्त्व झाकोळलं जाईल, असे त्यांना वाटते. नेहरुंना लोकं आधुनिक देशाचा शिल्पकार मानतात. 1947 मध्ये नेहरुजींनी आयआयटी, आयआयएम, इस्रो यांसारख्या संस्था साकारल्या होत्या." 


माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत गौरव वल्लभ यांनी म्हटलं की, "लहान मनाने कोणीही मोठा होत नाही आणि तुम्ही तुमच्या लहान मनाची ओळख देशाला करुन दिली आहे. तुम्ही बोर्डावरुन पंडितजींचे नाव पुसून टाकाल, पण 140 कोटी लोकांच्या मनातून त्यांचे नाव कधीही पुसून टाकू शकणार नाही."


हे संग्रहालय नवी दिल्लीमधील तीन मूर्ती भवन परिसरात आहे. तीन मूर्ती भवन हे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचे अधिकृत निवासस्थान होते. सांस्कृतिक मंत्रालयाने शुक्रवारी या संग्रहायलाचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Manipur Violence : 'मणिपूरची परिस्थिती लीबिया, सीरियासारखी', माजी लेफ्ट.जनरल निशिकांत सिंह यांचं ट्वीट; माजी लष्करप्रमुख सरकारला म्हणाले...