Crop Cultivation : सध्या खरिपाचा हंगाम (Kharif season) संपला आहे. पावसानंही उघडीप दिली आहे. या काळात खरिपाची पीक कापणी होऊन बाजारात आली आहे. तर दुसरीकडं पेरणीसाठी शेतकरी रब्बी पिकांचे (Rabi crops) बियाणे बाजारातून आणत आहेत. काही शेतकऱ्यांनी पेरणीही सुरु केली आहे. तर अनेक शेतकऱ्यांची पीक पेरणी पूर्ण झाली आहे. दरम्यान, उत्तर भारतातील (North India) जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशसह हरियाणामध्ये रब्बी पिकांची पेरणी सुरू आहे. चालू रब्बी हंगामात 28 ऑक्टोबरपर्यंत सर्व पिकांची एकूण 37.75 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत उत्तर भारतात 27.24 लाख हेक्टरवर पेरणी झाली होती.
खरीप पिकांची काढणी पूर्ण झाल्यावर रब्बी पिकांच्या पेरणीला वेग आला आहे. उत्तर भारतात देखील वेगानं पेरणी सुरु आहे. उत्तर भारतात मागील वर्षीच्या तुलनेत पिकांच्या पेरणीत मोठी वाढ झाली आहे. आत्तापर्यंत उत्तर भारतात 37.75 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. केंद्र सरकारच्या कृषी मंत्र्यालयाकडून रब्बी पिकांच्या पेरणीची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. अशा स्थितीत खरीप पिकांप्रमाणेच रब्बी पिकांचे उत्पादनही देशात भरपूर होईल, अशी अपेक्षा आहे.
गव्हाच्या पेरणीत मोठी वाढ होण्याची शक्यता
केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार रब्बी हंगामात आतापर्यंत 54 हजार हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली आहे. गहू हे मुख्य रब्बी पीक आहे. दरवर्षी ऑक्टोबरमध्ये पेरणी केली जाते. ऑक्टोबरमध्ये पेरणी झालेले पीक मार्च ते एप्रिलपर्यंत तयार होऊन बाजारात येते. दरम्यान, येणाऱ्या काळात गव्हाच्या पेरणीत मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कोणत्या राज्यात किती पेरणी झाली
कोणत्या राज्यात किती पेरणी झाली याची माहिती देखील केंद्र सरकारनं जाहीर केली आहे. 25 ऑक्टोबरपर्यंत उत्तर प्रदेशात सुमारे 39 हजार हेक्टर, उत्तराखंडमध्ये 9 हजार हेक्टर, राजस्थानमध्ये 2 हजार हेक्टर आणि जम्मू-काश्मीरमध्ये 1 हजार हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली आहे. एक वर्षापूर्वी कडधान्य पेरणीखालील क्षेत्र 5.91 लाख हेक्टर होते, ते या रब्बी हंगामात 8.82 लाख हेक्टरवर पोहोचले आहे. डाळींमध्ये हरभरा उत्पादनातही वाढ झाली आहे.
तेलबिया पिकांची पेरणी 19.96 लाख हेक्टरवर
केंद्र सरकारनं दिलेल्या माहितीनुसार, देशात तेलबियांची पेरणीही मुबलक प्रमाणात झाली आहे. चालू हंगामात 6 प्रकारच्या तेलबिया पिकांची 19.96 लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. तेलबिया पिकांच्या क्षेत्रात यंदा लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या वर्षी याच वेळेपर्यंत 15.13 लाख हेक्टर क्षेत्रावर तेलबियांची पेरणी झाली होती. गतवर्षी 14.21 लाख हेक्टरवर मोहरीची पेरणी झाली होती, ती वाढून 18 लाख हेक्टरवर पोहोचली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: