Jammu Kashmir Terrorism : केंद्र सरकारने बुधवारी मोठी कारवाई केली आहे. मुस्लीम लीग जम्मू-काश्मीर मसरत आलम (MLJK-MA) या संघटनेवर बंदी घातली आहे. केंद्र सरकारने ही कारवाई बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायद्यानुसार (UAPA) ही कारवाई करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये (Jammu Kashmir Terrorist Activity) या संघटनेचा सहभाग असल्याचे समोर आले. त्याशिवाय, दहशतवादी गटांना या संघटनेकडून पाठिंबा दिला जात होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्वीटरवर कारवाईची माहिती दिली.
गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले की, मुस्लिम लीग जम्मू काश्मीर (मसरत आलम गट)/MLJK-MA ला UAPA अंतर्गत 'बेकायदेशीर संघटना' घोषित करण्यात आले आहे. "ही संघटना आणि तिचे सदस्य जम्मू आणि काश्मीरमध्ये देशविरोधी आणि फुटीरतावादी कारवायांमध्ये गुंतलेले आहेत, दहशतवादी कारवायांचे समर्थन करतात आणि लोकांना जम्मू आणि काश्मीरमध्ये इस्लामिक राज्य स्थापन करण्यासाठी प्रवृत्त करत असल्याचे शाह यांनी म्हटले.
अमित शाह यांनी म्हटले की, मोदी सरकारची भूमिका स्पष्ट असून देशाची एकात्मता, सार्वभौमत्व आणि अखंडतेच्या विरोधात काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला माफ केले जाणार नाही. त्या व्यक्ती, संघटनांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचे शाह यांनी स्पष्ट केले.
कोण आहे मसरत आलम?
2019 पासून दिल्लीच्या तिहार तुरुंगात असलेला मसरत आलम भट्ट काश्मिरी कट्टरपंथी फुटीरतावादी गट ऑल पार्टी हुर्रियत कॉन्फरन्सचा (APHC) अध्यक्ष आहे. 2021 मध्ये त्याची या पदावर नियुक्ती झाली. 50 वर्षीय मसरत आलमवर राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) दहशतवाद्यांना निधी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 2010 मध्ये, काश्मीर खोऱ्यात मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक निदर्शनांमध्ये त्याच्या कथित भूमिकेसाठी त्याला अटक करण्यात आली होती. पब्लिक सेफ्टी अॅक्ट (PSA) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे.