नवी दिल्ली : आंतरराज्य सीमेवर वाहतुकीला स्थानिक प्रशासनाकडून अडथळे येत असल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्रालयाकडून राज्यांची कानउघडणी करण्यात आली आहे. केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्यांना तशी पत्रं लिहली आहेत. आंतरराज्य सीमेवर वाहतुकीला वेगळ्या परवानाची गरज नसल्याचं यात म्हटलं आहे. कोरोनाला रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं आहे. यातून केवळ अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत.
संपूर्ण देशात लॉकडाऊन जरी असले तरी जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरुच आहे. यातील मोठ्या प्रमाणातील वाहतूक ही रस्त्यावरुन आहे. परिणामी अनेक राज्यांच्या सीमा ओलांडताना स्थानिक प्रशासनाकडून अडथळे येत असल्याच्या तक्रारी केंद्राकडे करण्यात आल्या आहेत. याची गंभीर दखल घेत केंद्राने सर्व राज्यांना सुचित केलं आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाचे सचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्यांसाठी एक प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे. यात आंतरराज्य सीमेवर वाहतुकीला स्थानिक प्रशासनाकडून होत असलेल्या अडथळ्यावरुन राज्यांची कानउघडणी केली आहे. आंतरराज्य वाहतुकीला वेगळ्या पासची गरज निर्वाळा गृहमंत्रालयाने दिला आहे. सोबतचं जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक चालू राहावी यासाठी गृहमंत्रालयाकडून सर्व राज्यांना पुन्हा निर्देश देण्यात आले आहेत.
लॉकडाऊन वाढण्याची शक्यता
देशातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 33 हजारांच्यावर पोहचली आहे. यात महाराष्ट्रातील मुंबईत कोरोनाचा संसर्ग वेगाने होताना दिसत आहे. त्यामुळे आगामी काळात लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत देण्यात येत आहे. यात दोन शक्यता सांगितल्या जात आहे. एक म्हणजे संपूर्ण देशात पुन्हा लॉकडाऊन वाढवण्यात येईल. अथवा जे जिल्हे रेड झोन म्हणून घोषित केले आहेत. अशा ठिकाणी फक्त लॉकडाऊन वाढवण्यात येईल. देशात घोषित करण्यात आलेल्या दुसऱ्या लॉकडाऊनचा कालावधी तीन मे ला संपत आहे. त्यामुळे आगामी चार दिवसात या संदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे.
लॉकडाऊनमुळे अडकलेले नागरिक घरी परतणार; जिल्हाधिकाऱ्यांकडून स्थलांतराची कार्यवाही
कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढला
देशातील डबलिंग रेट म्हणजे कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. लॉकडाऊनपूर्वी देशातील कोरोना रुग्णांचा डबलिंग रेट हा आधी 3.41 दिवस होता आता तो 11 दिवस झाला आहे. विशेष म्हणजे यातील काही राज्यांचा डबलिंग रेट याहूनही वाढला आहे. तर, काही रांज्यांमध्ये कोरोना रुग्ण दुप्पट होण्यासाठी 40 दिवसांचा कालावधी लागत आहे. लॉकडाऊन यशस्वीरित्या पाळल्याने कोरोनाला अनेक ठिकाणी रोखण्यात यश आल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले.
Corona Cremation | मृत कोरोना रुग्णाचा अंत्यविधी 12 तासाच्या आत करावा, राज्य सरकारच्या सूचना