मुंबई : राज्यात शिक्षणाचा जसा ‘लातूर पॅटर्न’ तयार झाला होता. तसाच राजस्थानमधील कोटा पॅटर्न शैक्षणिक क्षेत्रात प्रसिद्ध आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी देण्यात येणाऱ्या पूर्व परीक्षांची तयारी तेथे करून घेतली जाते. या शिक्षणासाठी महाराष्ट्रातून दरवर्षी हजारो विद्यार्थी कोटा (राजस्थान) येथे जातात. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. दळण-वळणाची साधने बंद झाली. त्यामुळे महाराष्ट्रातील सुमारे दीड हजारांवर विद्यार्थी कोटामध्ये अडकले आहेत. या विद्यार्थ्यांना माघारी आणण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांनी शासनास विनंती केली होती.


राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब यांनी केंद्र शासन व राजस्थान सरकारशी चर्चा करुन कोटा येथे अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांना आणण्यासाठी यशस्वी बोलणी करुन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे आगारातून 73 बसेस रवाना केल्या होत्या. त्या बस कोटा येथे आज पोहचल्या आहेत. त्यामुळे लवकरच कोटा येथे अडकलेले विद्यार्थी स्वगृही परतणार आहे.


कोटाला एसटी बसेस पोहचल्या असून जिल्हानिहाय बसेस सोडण्यात येणार आहे.  या बस विद्यार्थ्यांना त्यांच्या जिल्ह्यात सोडणार आहे. महाराष्ट्र दिनी आम्ही महाराष्ट्रात येणार आहोत, अशा प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिल्या आहेत. तसेच विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब यांचे आभार मानले आहेत.


धुळे ते कोटा हे 630 किलोमीटरचे अंतर आहे. त्यामुळे प्रत्येक बसवर दोन चालकांची नियुक्ती केली आहे. या चालकांना स्वसंरक्षणासाठी परिवहन महामंडळाने आवश्यक साहित्य उपलब्ध करुन दिले आहे. त्यात मास्क, सॅनिटायझरचा समावेश आहे. तत्पूर्वी सर्व बस सॅनिटायझर करण्यात आल्या. या बस मंदसौर, रतलाममार्गे कोटा (राजस्थान) येथे पोहोचतील आणि त्यानंतर त्या राज्यातील विद्यार्थ्यांना धुळे येथे आणण्यात येणार आहे.


संबंधित बातम्या :

राजस्थानातील कोटा येथे अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांना आणण्यासाठी धुळ्यातून 70 बस रवाना

coronavirus | कोटामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी धुळ्यातून 100 एसटी पाठवणार : अनिल परब