Census In India : केंद्र सरकारकडून (Central Government) करण्यात येत असलेल्या जनगणनेची (Census) माहिती समोर आली आहे. पुढील वर्षापासून देशात जनगणना सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जनगणना 2025 पासून सुरू होईल आणि 2026 पर्यंत चालेल. 2021 मध्ये जनगणना होणार होती. परंतु, कोविड महामारीमुळे (COVID-19 Pandemic) जनगणना पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे देशात पुढच्या वर्षात जनगणना करण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत मोदी सरकार (Modi Government) आहे, अशी माहिती मिळत आहे. 


पुढच्या वर्षापासून देशात जनगणना केली जाणार असून आता आता जनगणनेचे चक्रही बदलणार आहे. आत्तापर्यंत 1991, 2001, 2011 इत्यादी दशकाच्या सुरुवातीला दर दहा वर्षांनी जनगणना केली जात होती. पण, आता 2025 नंतर पुढील जनगणना 2035, 2045, 2055 अशी केली जाणार आहे. जनगणना पूर्ण झाल्यानंतर लोकसभेच्या जागांचं सीमांकन सुरू होईल, 2028 पर्यंत सीमांकन प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. 


अनेक विरोधी पक्षांकडून जात जनगणनेची मागणी होत आहे, मात्र सरकारनं अद्याप याबाबत निर्णय घेतलेला नाही. जनगणनेत धर्म आणि वर्ग विचारले जातात. सर्वसाधारण, अनुसूचित जाती आणि जमातीची गणना केली जाते. यावेळी लोकांना ते कोणत्या पंथाचे अनुयायी आहेत, हे देखील विचारलं जाऊ शकतं. उदाहरणार्थ, कर्नाटकात, लिंगायत, जे सामान्य श्रेणीतील आहेत, ते स्वतःला एक वेगळा पंथ मानतात. त्याचप्रमाणे अनुसूचित जातींमध्ये वाल्मिकी, रविदासी, असे विविध पंथ आहेत. म्हणजेच धर्म, वर्ग आणि पंथाच्या आधारावर जनगणना करण्याच्या मागणीवर सरकार विचार करत आहे, अशी माहिती मिळत आहे.