श्रीनगर : देशभर ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. मात्र ईदच्या पवित्र दिवसांमध्येही पाकिस्तानने आपली नापाक कृत्ये सुरूच ठेवली आहेत. पाकिस्तानने नौशेरा सीमेवर केलेल्या गोळीबारात एक भारतीय जवान शहीद झाला आहे. तर दुसरीकडे श्रीनगरमध्ये नमाज अदा केल्यानंतर भारतीय जवानांवर दगडफेक करण्यात आली. दरम्यान जमावाने दहशतवादी संघटना आयसिस आणि पाकिस्तानचे झेंडे देखील फडकावले.


भारतीय जवान विकास गुरुंग शहीद


पाकिस्तानने नौशेरा सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात भारतीय जवान विकास गुरुंग जखमी झाले होते. जखमी अवस्थेत त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.


लष्कराने केलेल्या गोळीबारात युवकाचा मृत्यू


श्रीनगरमध्ये शुक्रवारी देखील जमावाने लष्कराच्या वाहनावर दगडफेक केली होती. यावेळी सेनेनं केलेल्या कारवाईत एका युवकाचा मृत्यू झाला होता. दगडफेक करणाऱ्या जमावाला पांगवण्यासाठी सेनेनं केलेल्या गोळीबारात विकास अहमद राथर (वय 24 वर्ष) याचा मृत्यू झाला होता, अशी माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिली होती.


जवानांवर किंवा लष्कराच्या वाहनांवर दगडफेक करण्याच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांत वाढ झाली आहे. अनेकदा स्थानिक नागरिक दहशतवाद्यांना वाचविण्यासाठी दगडफेक करताना आढळले आहेत. यासंपूर्ण परिस्थितीवर बोलताना काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणाले होते की, 'मुलं चुका करू शकतात, म्हणून युवकांवरील गुन्हे मागे घेण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. भारतीय जवानांवर आणि लष्कराच्या वाहनांवर दगडफेक करण्यासाठी युवकांची दिशाभूल केली जाते.'


संबंधित बातम्या


शहीद जवान औरंगजेब यांचा मृत्यूपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल