बंगळुरु : नोकरीचा शेवटचा दिवस अनेकांसाठी इमोशनल असतो. सहकाऱ्यांना निरोप देण्याचं दुख: असतंच पण नव्या नोकरी आनंदही शेवटच्या दिवशी असतो. शेवटचा दिवस लक्षात राहावा, यासाठी काही सहकारी सरप्राईज प्लॅनही करतात. पण बंगळुरुमधील एका सॉफ्टवेअर इंजिनिअरचा ऑफिसमधील शेवटचा दिवस खास ठरला.

कारण हा सॉफ्टवेअर इंजिनिअर शेवटच्या दिवशी चक्क घोड्यावरुन ऑफिसला गेला. आपला सहकारी घोड्यावरुन आल्याचं पाहून सर्वच अवाक् झाले. रुपेश वर्मा असं या सॉफ्टवेअर इंजिनिअरचं नावं असून त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

बंगळुरुमधील रिंग रोड परिसरात अॅम्बेसी गोल्फ रिंग या कंपनीत तो काम करत होता. विशेष म्हणजे सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ऑफिसमधला अखेरचा दिवस, असा मेसेजही त्याने घोड्यावर लावला होता. पण सकाळी सात वाजता निघालेला रुपेश ट्रॅफिक आणि घोड्याच्या विश्रांतीमुळे दुपारी दोन वाजता ऑफिसला पोहोचला.



दरम्यान, रुपेश घोड्यावर बसून आल्याने त्याला कंपनीच्या गेटवरच अडवण्यात आलं होतं. मात्र घोडाही प्रवासाचं साधन आहे, असं म्हणत रुपेश घोड्याला घेऊन कंपनीच्या कॅम्पसमध्ये दाखल झाला.

मूळचा राजस्थानचा असलेल्या रुपेशला नोकरीचा कंटाळा आल्यामुळे त्याने राजीनामा दिला. 'सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून आम्ही परदेशी कंपन्यांसाठी काम करतो. सॉफ्टवेअरशी संबंधित कठीण समस्या सोडवतो. मग हेच काम आम्ही स्वत:च्या देशासाठी का करु शकत नाही? देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा असल्याने नोकरी सोडली. आता स्वत:चं स्टार्टअप सुरु करण्याचा माझा विचार आहे, असं रुपेशने सांगितलं.

पाहा व्हिडीओ