CBI Raids: 538 कोटींच्या कथित बँक फसवणूक प्रकरणी CBI नं शुक्रवारी (5 मे) जेट एअरवेजचे (Jet Airways) संस्थापक नरेश गोयल (Naresh Goyal) यांच्यावर मोठी कारवाई केली. गोयल यांच्या कार्यालयासह सात ठिकाणी सीबीआयनं (CBI) छापे टाकले. याशिवाय विमान कंपनीचे माजी संचालक गौरांग आनंद शेट्टी यांच्या निवासस्थानाची आणि कार्यालयांचीही सीबीआयकडून झडती घेण्यात आली.
सीबीआयनं सांगितलं की, जेट एअरवेजच्या दिल्ली (Delhi) आणि मुंबईतील (Mumbai) परिसर, एअरवेजचे माजी अधिकारी आणि गोयल यांच्या जागेवर छापे टाकण्यात येत आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, कॅनरा बँकेच्या तक्रारीनंतर फसवणुकीबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये निधीचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सूत्रांच्या हवाल्यानं एएनआय वृत्तसंस्थेनं माहिती दिली की, "नरेश गोयल यांची पत्नी अनिता गोयल यांच्यासह अनेक लोक बँक फसवणूक प्रकरणात आरोपी आहेत." दरम्यान, जेट एअरवेज ही एकेकाळी भारतातील सर्वात मोठ्या खाजगी विमान कंपन्यांपैकी एक होती. परंतु एअरवेजनं एप्रिल 2019 मध्ये नगदी संकटाचा हवाला देत त्यांचे ऑपरेशन्स स्थगित केले होते.
त्यानंतर, नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) मधील दिवाळखोरी रिझोल्यूशन प्रक्रियेअंतर्गत जालान कॅलरॉक कन्सोर्टियमनं जेट एअरवेजसाठी बोली जिंकल्यानंतर कंपनी पुनरुज्जीवित होण्याच्या प्रक्रियेत होती. नरेश गोयल, अनिता गोयल, जेट एअरवेज आणि इतर आरोपींनी या संपूर्ण प्रकरणात अद्याप काहीही सांगितलेलं नाही. तसेच, पुढील तपास सुरू असल्याचंही सीबीआयनं सांगितलं.
UAE चे व्यापारी मुरारी लाल जालान आणि लंडनस्थित कंपनी कालरॉक कॅपिटल (Kalrock Capital) यांच्या एका संघानं जून 2021 मध्ये जेट एअरलाईन इनसॉल्वेंसी प्रोसेसमध्ये विकत घेतली. सीबीआयनं जेट एअरवेज आणि तिच्या संस्थापकांवर निधीचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. एजन्सीच्या म्हणण्यानुसार, 1 एप्रिल 2011 ते 30 जून 2019 दरम्यान, व्यावसायिक आणि सल्लागार खर्च म्हणून 1,152.62 कोटी रुपये खर्च केले आहेत. जेट एअरलाइनशी संबंधित कंपन्यांचे 197.57 कोटी रुपयांचे व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात आहेत. यामध्ये कंपनीचे अनेक अधिकारीही सहभागी झाले होते. तपासणीत असं आढळून आलं की, 1152.62 कोटी रुपयांपैकी, कंपनीनं अशा सेवांशी काहीही संबंध नसलेल्या कंपन्यांना व्यावसायिक आणि सल्लागार खर्च म्हणून 420.43 कोटी रुपये दिले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Go First flights: 'गो फर्स्ट' जमिनीवरच! 9 मे पर्यंतची सर्व विमान उड्डाणे रद्द, प्रवाशांना मनस्ताप