मुंबई : व्हिडीओकॉन कर्ज प्रकरणात दोषी आढळलेल्या चंदा कोचर यांच्याविरोधात सीबीआयनं लूकआऊट नोटीस जारी केली आहे. चंदा कोचर यांना देश सोडून जाण्यास मनाई करण्यात आली आहे. सीबीआयनं सर्व विमातळांवरील इमिग्रेशन विभागाला चंदा कोचर यांनी देश सोडून जाण्याचा प्रयत्न केल्यास तशी माहिती कळवा असं सांगितलं आहे.


VIDEO | चंदा कोचर यांना सीबीआयची लूकआऊट नोटीस

चंदा कोचर यांच्यावर सीबीआयने 22 जानेवारी रोजी गुन्हा दाखल केला होता. पदांचा गैरवापर करत मर्जीतील लोकांना आर्थिक फायदा दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. यात चंदा कोचर, वेणूगोपाल धूत यांच्यासह इतर पाचजणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

व्हिडीओकॉन कर्ज प्रकरणात चंदा कोचर दोषी

व्हिडीओकॉन कर्ज प्रकरणात चंदा कोचर दोषी ठरल्या असून त्यांच्यावर बँकेच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. आयसीआयसीआय बँकेच्या अंतर्गत चौकशी समितीने हा निष्कर्ष काढला आहे. चंदा कोचर या आयसीआयसीआय बँकेत सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक पदावर होत्या.

आयसीआयसीआय बँकेने वेणुगोपाल धूत यांच्या व्हिडीओकॉन समूहाला 3,250 कोटींचे कर्ज दिले. त्याबदल्यात धूत यांनी चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या कंपनीत 64 कोटी रुपये गुंतवल्याचा आरोप होता. यापुढे चंदा कोचर यांना बोनससह अन्य भत्ते देण्यात येणार नाहीत, असे आयसीआयसीआय बँकेने म्हटले आहे.

ICICI बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांचा राजीनामा
ICICI बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांनी आपल्या पदाचा ऑक्टोबर महिन्यात राजीनामा दिला होतो. बँकेने कोचर यांचा राजीनामा मंजूर करत कोचर यांना ICICI बँकेच्या सर्व जबाबदारीतून मुक्त केलं जात आहे, असं  स्पष्ट केलं होतं. संदीप बक्शी यांच्यावर ICICI बँकेच्या एमडी आणि सीईओ पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पुढील पाच वर्षांसाठी बक्शी यांना पदासाठी नियुक्त करण्यात आलं आहे.

चंदा कोचर यांच्यावरील आरोप
धूत यांच्या व्हिडीओकॉन ग्रुपला 20 बँकांच्या ग्रुपनं कर्ज दिलं होतं. ज्यात आयसीआयसीआय बँकेचा वाटा 10 टक्के होता. मात्र धूत यांनी आयसीआयसीआयकडून मिळणाऱ्या कर्जाच्या बदल्यात चंदा कोचर यांचे पती दीपक यांच्यासोबत मिळून न्यू पॉवर रिन्यूएबल नावानं कंपनी उघडली. ज्यात दीपक यांची 50 टक्क्यांची भागीदारी होती.
हा सरळ सरळ भ्रष्टाचार असल्याचा आरोप करत शेअरहोल्डर अरविंद गुप्तांनी थेट पंतप्रधानांना पत्र लिहून तक्रार केली होती.

वेणुगोपाल धूत आणि आयसीआसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर आणि त्यांच्या दोन नातेवाईकांनी मिळून डिसेंबर 2008 मध्ये एक कंपनी स्थापन केली. या कंपनीला ‘घरच्याच’ आयसीआसीआय बँकेने तब्बल 64 कोटी रुपयांचं कर्ज दिलं. मात्र अवघ्या काही दिवसात या कंपनीची मालकी अवघ्या 9 लाख रुपयात दीपक कोचर यांना मिळाली.

माजी न्यायमूर्तींकडून चौकशी
चंदा कोचर यांच्यावरील आरोपांची चौकशी सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती बीएन श्रीकृष्ण यांच्यावर सोपवण्यात आली होती. न्यायमूर्ती श्रीकृष्ण यांच्या नेतृत्त्वात आयसीआयसीआय बोर्डाने व्हिडीओकॉन कर्ज प्रकरणाची स्वतंत्र चौकशी केली.

संबंधित बातम्या

व्हिडीओकॉनचे वेणुगोपाल धूत यांच्या कार्यालयांवर सीबीआयचे छापे


मुंबई :आयसीआयसीआय बँकेच्या प्रमुख चंदा कोचर यांना सेबीची नोटीस


ICICI बँकेच्या प्रमुख चंदा कोचर यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं


ICICI बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांचा राजीनामा


बँक टॅम्परिंग! चंदा कोचर गोत्यात, व्हिडीओकॉनचं 3 हजार कोटीचं कर्ज वादात!