Visa Corruption Case : माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम (P. Chidambaram) यांचा मुलगा कार्ती चिदंबरम (Karti Chidambaram) यांच्या निकटवर्तीयाला सीबीआयनं अटक केली आहे. व्हिजा भ्रष्टाचार प्रकरणी ही मोठी अटक करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. सीबीआयनं रात्री उशिरा कार्ती चिदंबरम यांच्या निकटवर्तीय भास्कर रमणला अटक केली. याच प्रकरणात (काल) सीबीआयनं कार्ती चिदंबरम यांच्या घर आणि कार्यालयावरही छापे टाकले होते. 


मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयनं कार्ती चिदंबरम यांचे निकटवर्तीय भास्कर रमणला रात्री उशीरा चेन्नईत अटक केली. यापूर्वी लाखो रुपये घेऊन व्हिसा तयार करण्याच्या प्रकरणात सीबीआयनं कार्ती चिदंबरम यांच्याशी संबंधित मालमत्तांवर कारवाई केली होती. या प्रकरणी सीबीआय कार्ती चिदंबरम यांचे निकटवर्तीय भास्कर रमन यांची चौकशी करत होती. त्यानंतरच सीबीआयनं त्यांना ताब्यात घेतलं आहे. कार्ती चिदंबरम यांनी चिनी कंपन्यांमधील लोकांना आपली खास ओळख वापरुन व्हिसा दिल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात येत आहे. तसेच, या व्हिसाच्या बदल्यात 50 लाख रुपये घेतल्याचाही ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. 


छापेमारीनंतर कार्ती चिदंबरम यांचं ट्वीट 


सीबीआयच्या छापेमारीनंतर कार्ती चिदंबरम यांनी केंद्रीय तपास यंत्रणांवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्वीट करून सांगितलं आहे की, "आतापर्यंत ही छापेमारी किती वेळा झाली, हे मोजायला मी विसरलोय. नक्कीच हा एक विक्रम असेल."


2018 मध्ये कार्ती चिदंबरम यांना झाली होती अटक 


आयएनएक्स मीडिया प्रकरणी झालेल्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांप्रकरणी कार्ती यांना अटक करण्यात आली होती. लंडनला गेलेले कार्ती चेन्नई विमानतळावर परत येताच त्यांना अटक करण्यात आली. चेन्नई विमानतळावरच सीबीआयकडून कार्ती यांची चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर त्यांना दिल्लीला नेलं जाणार आहे. आयएनएक्स मीडियामध्ये 2007 साली 300 कोटींची परकीय गुंतवणूक आणण्यासाठी परवानगी घेताना गैरप्रकार झाल्याचा कार्ती यांच्यावर आरोप करण्यात आला होता. त्यावेळी पी. चिदंबरम केंद्रीय अर्थमंत्री होते. 


प्रकरण नेमकं काय? 


263 चिनी नागरिकांना व्हिसा देण्यासाठी पॉवर कंपनीला मदत केल्याच्या 11 वर्ष जुन्या आरोपाच्या चौकशीच्या संदर्भात सीबीआयनं लोकसभा सदस्य कार्ती चिदंबरम यांच्या विरोधात नवीन गुन्हा दाखल केला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, कार्तीवर 2011 मध्ये 50 लाख रुपयांची लाच घेऊन चिनी नागरिकांना व्हिसा मिळवून दिल्याचा आरोप आहे. कार्ती यांचे वडील पी. चिदंबरम त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री होते. गुन्हा नोंदवल्यानंतर सीबीआयनं दिल्ली आणि चेन्नई येथील चिदंबरम यांच्या घरासह देशातील अनेक शहरांमध्ये 10 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले.