राहुल गांधी यांनी ट्विटरवर लिहिलं आहे की, "कर्नाटकमध्ये काँग्रेस-जेडीएस आघाडी सरकार स्थापन झाल्याच्या पहिल्या दिवसापासून स्वार्थी हेतूसाठी बाहेरुन आणि आतून निशाण्यावर होतं. जे लोक या आघाडीच्या सत्तेला एक धोका आणि अडथळ्याच्या रुपात पाहत होते, त्यांच्या लालसेचा आज विजय झाला. हा लोकशाही, प्रामाणिकपणा आणि कर्नाटकच्या जनतेचा पराभव आहे."
प्रियांका गांधी काय म्हणाल्या?
प्रियांका गांधी यांनीही भाजपवर निशाणा साधताना म्हटलं की, "सगळं खरेदी केलं जाऊ शकत नाही. प्रत्येकाची बोली लावता येत नाही आणि प्रत्येक खोट्या गोष्टीचा अखेर पर्दाफाश होतो, हे एक दिवस भाजपच्या लक्षात येईल. तोपर्यंत मला वाटतं की, आपल्या देशाच्या जनतेला कमजोर होणारी लोकशाही, बेलगाम भ्रष्टाचार आणि संस्थांचा विद्ध्वंस सहन करावं लागेल."
काँग्रेस-जेडीएस आघाडी सरकार कोसळलं
कर्नाटकमध्ये मंगळवारी (23 जुलै) मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी सरकार विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यास अपयशी ठरलं. विश्वासदर्शक ठरावावर झालेल्या मतदानात सत्ताधारी पक्षाला केवळ 99 मतं मिळाली, तर भाजपच्या बाजून 105 मतं पडली. परिणामी 14 महिन्यांचं काँग्रेस-जेडीएस आघाडी सरकार कोसळलं. यावेळी सभागृहात एकूण 204 आमदार उपस्थित होते. विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर भाजपने एकच जल्लोष केला. तर काँग्रेस आणि जेडीएसच्या गोटात निराशेचं वातावरण होतं.
कोण-कोण सभागृहात नव्हतं?
विधानसभेच्या कामकाजात 20 आमदारांनी सहभाग घेतला नव्हता, त्यामुळे सभागृहाची संख्या कमी होऊन 204 झाली. मंगळवारी ज्यावेळी विश्वासदर्शक ठरावावर मतदान होत होतं, त्यावेळी काँग्रेस-जेडीएसके 17, बसपाचा एक आणि दोन अपक्ष आमदार सभागृहात नव्हते. अशाप्रकारे हे आघाडी सरकार 103 हा बहुमताचा आकडा गाठू शकला नाही.
विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी आमदारांना उभं करुन सत्ताधारी आणि विरोधी संख्याबळाची गणना केली. विधासभा अध्यक्षांनी प्रत्येक रांगेतील आमदारांना वेगवेगळं उभं करु अधिकाऱ्यांमार्फत आमदारांची मोजणी केली. सभागृहात आमदारांची अशी गणना करण्याची ही पहिलीच वेळ होती.
येडियुरप्पा यांना सरकार स्थापन करण्याचं आमंत्रण मिळणार
विश्वासदर्शक ठरावात सरकार कोसळल्यानंतर मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी पदाचा राजीनामा दिला. राज्यपाल वजुभाई वाला यांनी त्यांचा राजनामाही स्वीकारला. लवकरच राज्यपाल भाजपचे नेते बीएस येडियुरप्पा यांना सरकार स्थापन करण्याचं आमंत्रण देऊ शकतात.
कुमारस्वामी सरकार पडल्यानंतर भाजपने आता सत्तेत येण्याची तयारी सुरु केली आहे. अखेरच्या क्षणी कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी भाजपने व्यवस्थित प्लॅनिंग केली आहे. त्यामुळेत मुंबईतील हॉटेलमध्ये राहणारे काँग्रेस-जेडीएसचे बंडखोर आमदार बीएस येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतरच बंगळुरुला रवाना होणार आहेत.