Cauvery Water Dispute : कावेरी नदीच्या (Cauvery River) पाणी वाटपावरुन कर्नाटक (Karnataka) आणि तामिळनाडू (Tamil Nadu) या दोन राज्यात संघर्ष होण्याची शक्यता आहे. कारण, कावेरी जल व्यवस्थापन प्राधिकरणाने तामिळनाडू राज्यासाठी 5000 क्युसेकनं पाणी सोडण्याचे आदेश कर्नाटकला दिले आहेत. या कावेरी जल व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (CWMA) निर्णयावर तामिळनाडूचे जलसंपदा मंत्री एस दुराई मुरुगन  (Durai Murugan ) यांनी टीका केलीय. पिके वाचवण्यासाठी सलग 10 दिवस दररोज 24000 क्युसेकनं पाणी सोडण्याची मागणी मंत्री एस दुराई मुरुगन यांनी केलीय. 


पाणी टंचाईच्या काळात आम्हाला निश्चित आधार हवा


आम्हाला फक्त शेतकऱ्यांची पिकं वाचवायची आहेत. सध्या पावसाची कमतरता आहे. त्यामुळं पिकांना पाण्याची गरज असल्याचे मत मंत्री एस दुराई मुरुगन यांनी व्यक्त केलं. जास्त पाऊस पडल्यास किती पाणी सोडावे लागेल याचा हिशोब केला जातो. त्याचप्रमाणे पाणी टंचाईच्या काळातही पाणी वाटपाचा आम्हाला निश्चित आधार हवा असे दुराई मुरुगन म्हणाले. त्यामुळं शेतकऱ्यांची पिकं वाचवण्यासाठी 10 दिवसांसाठी 24000 क्युसेकनं पाणी सोडण्याची आमची मागणी असल्याचे दुराई म्हणाले. दरम्यान, कावेरी जल नियमन समितीच्या शिफारशीनुसार तामिळनाडूला 15 दिवस 5000 क्युसेकनं पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.


पाणी वाटपाच्या प्रश्नासंदर्भात तामिळनाडू सरकार सर्वोच्च न्यायालयात 


दरम्यान, या पाणी वाटपाच्या प्रश्नासंदर्भात तामिळनाडू सरकार सर्वोच्च न्यायालयात गेल्याची  माहिती तामिळनाडूचे जलसंपदा मंत्री एस दुराई मुरुगन यांनी दिली. तामिळनाडू आणि कर्नाटकमधील कावेरी पाणी व्यवस्थापन वादावर शुक्रवारी (1 ऑगस्ट) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी, कावेरी जल व्यवस्थापन प्राधिकरणाने मंगळवारी आपली बैठक घेतली. यामध्ये कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन्ही राज्यांचे म्हणणे ऐकले. यासोबतच कावेरी जल नियमन समितीच्या (CWRC) शिफारशीही विचारात घेण्यात आल्या.


तामिळनाडूची मागणी 


तामिळनाडू सरकारनं कावेरी नदीचे 24 हजार क्युसेकनं पाणी सोडण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी तामिळनाडू सरकार सुप्रीम कोर्टातही गेलं आहे. त्यावर 1 ऑगस्टला सुनावणी होणार आहे. दरम्यान, तामिळनाडू सरकारच्या याचिकेला विरोध करताना कर्नाटक सरकारनं कर्नाटकच्या जलाशयांमध्ये पाणी येत नाही, त्यामुळे पाणी सोडू शकत नाही, असं म्हटलं होतं.


कावेरी नदी


कावेरी नदी ही कर्नाटक, तमिळनाडू आणि केरळमध्ये वाहते. समुद्रात जाण्यापूर्वी ती पदुच्चेरीच्या कराइकलमधूनही जाते. 800 किमी लांबीची कावेरी नदी पश्चिम घाटातील ब्रह्मगिरी पर्वतातून निघते. हा भाग कर्नाटकच्या कुर्ग परिसरात येतो. 


महत्त्वाच्या बातम्या:


Kolhapur : कोल्हापुरात पाणी प्रश्न पेटला... इचलकरंजीला पाणी दिल्यास रक्तपात होईल; मंत्री हसन मुश्रीफ यांचे वादग्रस्त वक्तव्य