गुरुग्राम : वयाची 23 वर्ष पूर्ण होण्यास अवघे काही दिवस असताना हरियाणाचा सुपुत्र जम्मू काश्मिरमधील हल्ल्यात शहीद झाला. कॅप्टन कपिल कुंडू यांना पाकिस्तानने केलेल्या मिसाईल हल्ल्यात वीरमरण आलं.


कॅप्टन कपिल कुंडू येत्या 10 फेब्रुवारीला वयाची 23 वर्ष पूर्ण करणार होते. 'जिंदगी बड़ी होनी चाहिए, लंबी नहीं' हा 'आनंद' चित्रपटातील संवाद त्यांच्यासाठी सार्थ ठरला.

कॅप्टन कपिल यांनी फेसबुकवर 'लाईफ शूड बी बिग, इंस्टेड ऑफ बीइंग लाँग' हे याच आशयाचं लिहिलेलं स्टेटस याची प्रचिती देतं. आयुष्य लहान असलं तरी चालेल, ते भव्य असाव, असं म्हणतच त्यांनी वयाच्या 23 व्या वर्षी निरोप घेतला.


काश्मीरच्या सीमेजवळ पाकिस्तानचा मिसाईलनं हल्ला, कॅप्टनसह ४ जवान शहीद


2012 मध्ये कॅप्टन कपिल कुंडू एनडीएमध्ये रुजू झाले. एनडीएच्या माध्यमातून ते सैन्यात दाखल झाले. सैन्याच्या 15 जॅकलाई युनिटमध्ये असलेले कॅप्टन कुंडू राजौरीमध्ये तैनात होते. ते मूळ हरियाणातील गुरुग्रामचे रहिवासी होते.

वडिलांच्या मृत्यूनंतर कपिल हे आई सुनिता यांचा आधार झाले. त्यांच्या दोन्ही मोठ्या बहिणींची लग्न झाली आहेत. कपिल यांना काळाने हिरावल्यामुळे कुंडू कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

जम्मू-काश्मीरच्या राजौरी आणि पुँछ भागात पाकिस्तानानं गोळीबाराबरोबरच थेट मिसाईलनं हल्ला चढवला. यात कॅप्टन कपिल कुंडूंसह चार जवान शहीद झाले आहेत. तर दोन स्थानिक नागरिकही जखमी झाले आहेत. नियंत्रण रेषेवर दोन्ही बाजूने गोळीबार झाला.

जवान राम अवतार, जवान शुभम सिंह आणि जवान रोशन लाल शहीद झाले, तर लान्स नायक इक्बाल अहमद हे यात गंभीर जखमी झाले आहेत.

या वर्षाच्या सुरुवातीलाच पाकिस्तानकडून आतापर्यंत अनेकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं असून यामध्ये 9 जवानांसह 17 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 70 जण जखमी झाले आहेत. 2017 साली पाकिस्ताननं तब्बल 881 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं होतं.