नवी दिल्ली : प्रचंड कर्ज आणि दिवसेंदविस वाढत जाणारा तोटा यामुळे एअर इंडियामधील आपले समभाग विकण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्र सरकारच्या कॅबिनेटच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली.


आता एअर इंडियाचे खासगीकरण होणे आता निश्चित झालं आहे. सरकारी अधिपत्याखालील एअर इंडिया ही देशातील सर्वात मोठी विमान कंपनी आहे. विमान वाहतूक बाजारात तिचा वाटा 17 टक्के एवढा आहे. अंतर्गत प्रवासी वाहतुकीतही एअर इंडियाकडे 14.6 टक्के एवढा वाटा आहे.

खासगी विमान वाहतूक कंपन्यांच्या वाढत्या विस्तारामुळे या बाजारातील एअर इंडियाचा वाटा दिवसेंदिवस घसरत चालला आहे.

या सर्व प्रक्रियेसाठी एका पॅनलची स्थापना केल्याची माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली. गेल्या काही काळापासून एअर इंडिया तोट्यात जात होती. त्यामुळे एअर इंडियाला नव्याने उभारी देण्यासाठी सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.