नवी दिल्ली : C-DOT च्या 40 व्या वर्धापन दिनी सायबर गुन्हे (Cyber Crime) नियंत्रणामध्ये आणण्यासाठी स्वदेशी AI प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीचे नाव त्रिनेत्र असून केंद्रीय दळणवळण राज्यमंत्री देवुसिंह चौहान यांनी शुक्रवारी या प्रणालीचे उद्घाटन केले. दरम्यान ही प्रणाली  सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलीमॅटिक्स (C-DOT) या शासनाच्या कंपनीकडून विकसित करण्यात आली आहे. देशात सायबर गुन्ह्यांच प्रमाण दिवसागणिक वाढताना दिसत आहे. त्यावर उपाययोजना म्हणून केंद्र सरकराकडून महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे. त्यासाठी या त्रिनेत्र प्रणालीची निर्मिती केली असल्याचं सांगण्यात येत आहे. 


त्रिनेत्र नेमकं काय करणार?


त्रिनेत्रमध्ये एकापेक्षा अनेक प्रणालींचे संयोजन करण्यात आले आहे. तसेच, ही प्रणाली चोवीस तास सायबर गुन्ह्यांवर लक्ष ठेवण्यास सक्षम असणार आहे. ही प्रणाली लॅपटॉप, कंप्युटरमध्ये वापरता येणार आहे. कोणत्याही गोष्टीचे विश्लेषण करण्यास ही प्रणाली मदत करणार आहे. तसेच, सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टीने ही AI प्रणाली विकसित करण्यात आली आहे. शासनाच्या विविध डिजिटल माध्यमांना सुरक्षित करण्यासाठी देखील ही प्रणाली सक्षम असणार आहे.


आत्मनिर्भर भारत बनवण्याच्या दृष्टीने तरुणांना आवाहन


राज्यमंत्री देवुसिंह चौहान यांनी यावेळी  C-DOT च्या एंटरप्राइज सिक्युरिटी ऑपरेशन सेंटरचे (ESOC) उद्घाटनही यावेळी केले आहे. तसेच यावेळी त्यांनी आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी सतत नवनवीन शोध घेण्याचे आवाहन केले आहे. ही एक स्वदेशी प्रणाली असल्यामुळे आत्मनिर्भर भारतच्या दृष्टीने हे महत्त्वाचं पाऊल असल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलं आहे. 


यावेळी  C-DOT च्या स्टार्टअपच्या माध्यमातून नाविन्यपूर्णरित्या विकसित केलेल्या प्रणालींचे प्रदर्शन या निमित्ताने भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनात थेट प्रात्यक्षिकं देखील दाखवण्यात आली आहेत. यामुळे आता बाजारपेठेसाठी लागणारा वेळ कमी करण्यात येणार असून  घरगुती तंत्रज्ञानाच्या निर्यातीसाठी नवीन संधी निर्माण करणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं आहे. तसेच राष्ट्रीय नेटवर्क मजबूत करण्यासाठी आणि राष्ट्राच्या एकूण विकासाला चालना देण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञानाच्या निर्मितीवर देखील भर देण्यात येणार आहे. 


C-DOT चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजकुमार उपाध्याय यांनी यावेळी C-DOT च्या प्रगतीविषयी देखील माहिती दिली आहे. तसेच संशोधकांच्या क्षमतेवर विश्वासदाखवल्याबद्दल त्यांनी माननीय मंत्री आणि इतर मान्यवरांचे आभार मानले आहेत.  आता  C-DOT च्या माध्यमातून स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलं आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Smart City Award : सर्वोत्कृष्ट 'नॅशनल स्मार्ट सिटी पुरस्कार' जाहीर, इंदूरनं मारली बाजी, तर महाराष्ट्रातील पिंपरी चिंचवडसह सोलापूरचा समावेश