नवी दिल्ली : दिल्लीत पावसामुळे आणखी एक इमारत कोसळली आहे. शुक्रवारी रात्री दिल्लीजवळील गाझियाबादमध्ये खोडा परिसरात पाच मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत कोणत्याही जीवितहानीची माहिती मिळालेली नाही.
शुक्रवारी रात्री उशिरा गाझियाबादमधील इमारत पत्त्यासारखी कोसळली. ही इमारत रहिवासी असल्याची माहिती आहे. कोसळलेल्या इमारतीचा ढिगारा उपसण्याचं काम सुरु करण्यात आलं आहे. अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. मात्र इमारतीतील सामानाचं मोठं नुकसान झालं आहे.
दरम्यान स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफची टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी बचावकार्याला सुरुवात केली आहे. इमारत कोसळल्याचा आवाज इतका भयानक होता की आसपासच्या इमारतीतील रहिवाशांमध्ये घबराटीचं वातावरण आहे. इमारत दुर्घटनेनंतर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तसंच स्थानिक खासदार घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.
दरम्यान 10 दिवसांपूर्वी 17 जुलै रोजी ग्रेटर नोएडामध्ये एक चार मजली आणि बांधकाम सुरु असलेली सहा मजली इमारत अशा दोन इमारती कोसळल्या होत्या. शाहबेरी परिसरात ही दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू होता असून 50 हून अधिकजण ढिगाऱ्याखाली अडकून जखमी झाले होते.
दोन इमारतींपैकी एका इमारतीत 10 ते 12 कुटुंब राहत होती. चार मजली इमारत जीर्ण झाली होती, तर दुसऱ्या इमारतीचं बांधकाम सुरु होतं. मंगळवारी रात्री परिसरात मोठा आवाज झाला. परिसरातील घाबरलेल्या लोकांनी भूकंप झाल्याचं समजून घराबाहेर पळ काढला. त्यावेळी दोन इमारती कोसळल्याचं त्यांच्या लक्षात आलं होतं.