बडोदा : गुजरातच्या बडोद्यातील खवय्यांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. बडोदा महानगरपालिकेने पाणीपुरी विक्रीवर बंदी घातली आहे. पावसाळ्यात पाणीपुरी खाणं आरोग्यासाठी हानिकारक असल्यानं बडोदा महापालिकेनं हा निर्णय घेतला आहे.


बडोदा महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी शहरातील हुजरात पागा, हाथीखाना, तुलसीवाडी, समा, छामीगाव, खोडियानगर, नवायार्ड, वारसिया नरसिंह टेकडी, सुदामा नगर या भागातील पाणीपुरी बनवणाऱ्या 50 हून अधिक ठिकाणांवर छापेमारी केली.


या छापेमारीत बडोदा महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी पाणीपुरीसाठी वापरले जाणारे खराब आणि सडलेले पदार्थ मोठ्या प्रमाणात जप्त केले. नागरिकांच्या आरोग्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करत पाणीपुरी विक्रीवरवर पावसाळा संपेपर्यंत बंदी घातली.


महापालिकेच्या कारवाईत चार हजार किलो पाणीपुरी, 3500 किलो बटाटे आणि हरभरा दाळ, 20 किलो तेल आणि 1200 लिटर पाणीपुरीसाठी वापरलं जाणारं पाणी जप्त केलं आहे. जप्त केलेलं सर्व सामान नष्ट करण्यात आलं आहे.


पावसाळ्यात दुषित पाण्यामुळे विविध साथीचे आजार पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे हा धोका टाळण्यासाठी महापालिकेकडून स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. पाणीपुरीसाठी वापरलं जाणाऱ्या दुषित पाण्यामुळे टॉयफॉईड, कॉलरा, कावीळ यांसारखे आजार होऊ शकतात.