हवाई प्रवासात फोन कॉल, इंटरनेट वापराला सशर्त मंजुरी!
एबीपी माझा वेब टीम | 01 May 2018 05:27 PM (IST)
ट्रायच्या माहितीनुसार, विमानाने 3000 मीटरची उंची गाठल्यानंतरच मोबाईलचा वापर करता येणार आहे.
नवी दिल्ली : विमानात असताना आता तुम्हाला मोबाईल बंद ठेवण्याची किंवा फ्लाईट मोडवर टाकण्याची गरज नाही. कारण हवाई प्रवासादरम्यान मोबाईल सेवा कनेक्टिव्हीटीला आज दूरसंचार आयोगाने सशर्त मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता विमानात असताना प्रवाशांना फोन कॉल आणि इंटरनेटचा वापर करता येणार आहे. डोमेस्टिक आणि आंतरराष्ट्रीय विमानांना ही मंजुरी मिळाली आहे. दूरसंचार आयोगाने टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात ट्रायच्या (TRAI) जवळपास सगळ्याच प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. प्रवाशांना येत्या तीन ते चार महिन्यांनंतर याचा लाभ घेता येईल. ट्रायच्या माहितीनुसार, विमानाने 3000 मीटरची उंची गाठल्यानंतरच मोबाईलचा वापर करता येणार आहे. लोकपालची स्थापना करणार ग्राहकांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी लोकपालचीही स्थापना केली जाणार आहे. यासाठी ट्रायच्या कायद्यात सुधारणा करणं आवश्यक आहे. दर तीन महिन्यांनी सुमारे 1 कोटी तक्रारी येतात. त्यामुळे लोकपाल स्थापन केल्याने तक्रारींचं उत्तम आणि समाधानकारक निवारण होईल, असं दूरसंचार सचिव अरुण सुंदरराजन यांनी सांगितलं.