बंगळुरु : कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या पहिल्याच प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे. राहुल यांनी हातात कागद न घेता कोणत्याही भाषेत 15 मिनिटं बोलावं, वाटल्यास मातृभाषेत बोलावं, असं खुलं आव्हान मोदींनी दिलं.

कर्नाटकमधील चामरानगरमध्ये मोदींनी जनतेशी संवाद साधला. आज एकाच दिवसात कर्नाटकात पंतप्रधानांच्या तीन प्रचारसभा होणार आहेत.

राहुल गांधी यांनी 17 एप्रिलला अमेठीमध्ये केलेल्या भाषणाचं उत्तर म्हणून मोदींनी हे आव्हान दिलं. 'मोदी संसदेत उभं राहायला घाबरतात. जर मोदींसमोर मला राफेल विमान खरेदीबाबत 15 मिनिटं बोलायची परवानगी मिळाली, तर मोदी त्याला सामोरं जाऊ शकणार नाहीत' असं राहुल गांधी म्हणाले होते.

'काँग्रेस अध्यक्षांनी मला आव्हान दिलं होतं. जर ते 15 मिनिटं संसदेत बोलले, तर मी बसू शकणार नाही. त्यांचं बरोबरच आहे. माझ्यासारखा एखादा सामान्य माणूस, ज्याला धड चांगले कपडेही घालता येत नाही, तो काँग्रेस अध्यक्षांसारख्या प्रभावी व्यक्तीसमोर बसूच शकत नाही. कारण ते नामदार आहेत, तर मी कामदार. मी तुम्हाला (राहुल गांधी) आव्हान देतो, कर्नाटक सरकारने केलेली चांगली कामगिरी कुठलाही कागद न वाचता 15 मिनिटांत सांगा. हिंदी, इंग्रजी अशा कोणत्याही भाषेत बोला. अगदीच काय मातृभाषेत बोलून दाखवा' असं मोदी म्हणाले.

राहुल यांच्या मातोश्री म्हणजेच सोनिया गांधींच्या इटालियन भाषेवरुन केलेली ही टिपण्णी मोदींनी राहुल गांधींवर केलेली सर्वात जहाल टीका मानली जात आहे.

कर्नाटक विधानसभेची निवडणूक 12 तारखेला होणार आहे. सध्या सत्तेत असलेल्या काँग्रेसला हटवणं आणि आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीनं नवी ऊर्जा निर्माण करणं, हे भाजपसमोर मोठं आव्हान आहे.