नवी दिल्ली : आज महाराष्ट्र दिन. याच निमित्ताने आज आम्ही तुम्हाला एका मराठी माणसाच्या कर्तृत्वाची अशी कहाणी सांगणार आहोत जी प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाला अभिमान वाटावी अशी आहे. महाराष्ट्राबाहेरच्या प्रांतात जाऊन तिथे आपल्या कर्तबगारीचा ठसा उमटवणारी ही प्रेरणादायी कहाणी आहे. आजवर दुर्लक्षित राहिलेल्या या योगदानावर प्रथमच प्रकाशझोत टाकणारा एबीपी माझाचा हा स्पेशल रिपोर्ट.
सुप्रीम कोर्टाची इमारत तुम्ही अनेकदा पाहिली असेल. काहींनी चित्रात काही टीव्हीवर पाहिली असेल. न्यायदेवतेचं मंदिर समजल्या जाणाऱ्या या इमारतीतून अनेकांच्या आयुष्याची कुंडली लिहिली जाते. आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं आम्ही तुम्हाला सुप्रीम कोर्टाच्या इमारतीचं महत्व का सांगतोय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण ही कहाणी सुप्रीम कोर्टाची नाही. आज अनेक महाराष्ट्रीयन आणि दिल्लीतल्याही लोकांना माहिती नसेल की या ऐतिहासिक इमारतीमागे एका मराठमोळ्या शिल्पकाराचा हात आहे.
गणेश भिकाजी देवळालीकर असं त्यांचं नाव. देशाचे पहिले चीफ आर्किटेक्ट. देवळालीकरांनी केवळ सुप्रीम कोर्टच नव्हे तर दिल्लीतल्या अनेक ऐतिहासिक इमारती बांधलेल्या आहेत.
1954 साली सुप्रीम कोर्टाच्या इमारतीचं भूमीपूजन झालं होतं. तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांना देशाचं सर्वोच्च न्यायालय कसं असेल याचा आराखडा गणेश उर्फ अण्णासाहेब देवळालीकर यांनी सादर केला होता. 1958 साली या इमारतीचं काम पूर्ण झालं. तेव्हापासून आजतागायत ही इमारत लोकशाहीच्या एका महत्वपूर्ण स्तंभाचं प्रतीक मराठी म्हणून कार्यरत आहे.
स्वातंत्र्यानंतर देश नव्यानं घडत असताना देवळालीकर नावाचा एक मराठी माणूस त्यात मोलाची कामगिरी बजावत होता.
देवळालीकरांनी किती मोठं काम करुन ठेवलं हे समजून घेण्यासाठी आधी ते ज्या पदावर काम करत होते त्याचं महत्व समजून घ्यायला पाहिजे. राष्ट्रपती भवन, इंडिया गेटसारख्या वास्तू बांधणारा ल्युटियन्स, कनाँट प्लेससारखी इमारत बांधणारा राँबर्ट रसेल यासारख्या दिग्गजांनी हे पद ब्रिटीश काळात सांभाळलं होतं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे पद सांभाळणारे देवळालीकर हे पहिले भारतीय होते. देवळालीकरांनी राँबर्ट रसेलसोबत अनेक इमारतींच्या बांधणीत काम केलेलं होतं. त्यांचं काम पाहूनच या ब्रिटीश अधिकाऱ्यांनी आमचा वारसा पुढे सांभाळण्यासाठी हा सर्वात योग्य माणूस आहे. अशी शिफारस भारत सरकारकडे केलेली होती. 1947 ते 1954 या अतिशय महत्वाच्या काळात देवळालीकरांनी देशाचे चीफ आर्किटेक्ट म्हणून काम पाहिलं.
गॅझेटेड ऑफिसर्सच्या वरची जागा गोऱ्या लोकांनाच मिळायची. रसेलसारख्या अधिकाऱ्यांनी ओळखलं की देवळालीकरांवर खूप अन्याय झाला. ‘दिल्ली इम्प्रवमेंट ट्रस्टचे अध्यक्ष जर कोणी चीफ आर्किटेक्ट करायचं असेल तर देवळालीकर यांनाच करा.’ असं रसेलनं पत्र लिहून सांगितलं. तरीपण सर्व्हिस कमिशनमध्ये उपचार म्हणून त्यांचा इंटरव्यूह झाला. सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायाधीश यांनी तो घेतलेला.
देवळालीकरांचं मूळ गाव हे नाशिकजवळचं देवळाली. बडोद्यात गायकवाडी स्थापन झाली तेव्हा त्यांनी नवं राज्य वसवण्यासाठी काही माणसं आवर्जून महाराष्ट्रातून नेली. त्यातलं हे देवळालीकर कुटुंब.
अण्णासाहेब देवळालीकरांचा जन्म हा 1895 सालचा बडोद्यातला. बडोद्याच्या कलाभवनमध्ये त्यांनी आर्किटेक्टची पदवी घेतली, त्यानंतर ते कामाच्या शोधात दिल्लीत आले.
सुरुवातीला काही काळ त्यांनी लाहोरमध्ये नोकरी केली. पण त्यांची हुशारी पाहून काही ब्रिटीश अधिकाऱ्यांनी त्यांना इंग्लडला जायचा सल्ला दिला. रिबा अर्था रॉयल इन्सिट्यूट ऑफ ब्रिटीश आर्किटेक्चर ही मानाची परीक्षा देवळालीकर एका झटक्यात पास झाले. त्यांच्या याच असामान्य गुणवत्तेमुळे ते देशाचे चीफ आर्किटेक्ट बनणारे पहिले भारतीय ठरले.
स्वातंत्र्योत्तर काळात जी देशाची बांधणी झाली. त्यासाठी सीपीडब्ल्यूडीची स्थापना झाली.
देवळालीकर त्याचे पहिले अध्यक्ष होते. आर्किटेक्टचं महत्व, वास्तुशास्त्रज्ञाचा रोलत्या दृष्टीनं पाहिलं तर देवळालीकराना शतशा नमन करायला हवं. भारताला मोठं करायचं ज्यांनी व्रत स्वीकारलं त्यामध्ये देवळालीकरांचं नाव घ्यायला हवं.
दिल्लीतलं कृषी भवन, उद्योग भवन, नॅशनल म्युझियम या सगळ्या इमारती देवळालीकरांनी साकारलेल्या आहेत.
देवळालीकरांच्या कामात इंडो-ब्रिटीश वास्तुकलेचा उत्तम संगम होता. आजही सुप्रीम कोर्टाची इमारत पाहिल्यावर ती इंग्रजांनीच बांधली असणार असं अनेकजण गृहित धरतात.
सुप्रीम कोर्टाच्या इमारतीची वैशिष्ट्ये
15 कोर्टरुम
रजिस्ट्रार कोर्ट,
म्युझियम
चेंबर्स
मोठे लाँन्स
ब्रिटीश आर्किटेक्टसना उपलब्ध होणारे रिसोर्सेस, आर्थिक पाठबळ यांचा विचार केला तर भारतीय आर्किटेक्टसचं काम तुलनेनं जास्त जिकीरीचं होतं. शिवाय त्यावेळी फाळणीनंतर अनेक निर्वासितांचे लोंढे दिल्लीत दाखल होत होते. या सगळ्यांना आसरा देण्याचं कामही तातडीनं करायचं होतं. त्यामुळे एकीकडे देशाच्या नवनिर्माणात कलात्योमक योगदान देत असतानाच त्यांना हे आणीबाणीचं कामही कर्तव्य म्हणून पार पाडावं लागलं.
दिल्लीतल्या सुंदरनगर, पटेलनगर, जोरबाग, गोल्फ लिंक्स इथल्या अनेक रिफ्युजी कॉलनी देवळालीकरांच्या नेतृत्वात बांधल्या गेल्या. एक दोन नव्हे तर तब्बल पाच लाख घरं त्यावेळी या निर्वासितांसाठी बांधली गेली.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देश घडवायचा म्हणजे कोऱ्या पाटीपासून श्रीगणेशा करण्यासारखं होतं. पण हे करतानाही सातत्यानं भविष्याचा विचार या सगळ्या टीमच्या समोर होता.
अण्णासाहेब देवळालीकर हे कडक शिस्तीचे, एकाग्रतेनं काम करणारे अधिकारी म्हणून प्रसिद्ध होते. त्यांची कारकीर्द संपल्यानंतर सरकारनं त्यांना पाच वर्षांची मुदतवाढ देऊन ठेवून घेतलं.
दिल्लीतल्या 4 महादेव रोडच्या बंगल्यात देवळालीकरांचं तेव्हा वास्तव्य होतं. एक वास्तुविशारद म्हणून शहराचा आराखडा बिघडू नये यासाठी ते किती दक्ष होते याचं एक छोटंसं उदाहरण आहे. शहरावर अतिरिक्त ताण येऊ नये म्हणून कुठल्याही सरकारी अधिकाऱ्यानं निवृत्तीनंतर दिल्लीत घरोबा करुन राहू नये असा त्यांचा दंडक होता. आपल्या निवृत्तीनंतर त्यांनी हा नियम कसोशीनं पाळला. दिल्लीतल्या अतिशय पॉश वस्तीतला हा बंगला सोडून निवृत्तीनंतर ते बडोद्याला परत गेले.
अण्णासाहेबांनी तमाम भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं सोमनाथचं मंदिरही बांधलं. सरदार पटेलांशी चांगले संबंध असल्यानं बहुधा त्यांनी या कामासाठी देवळालीकरांचा सल्ला घेतला होता.
महत्वाच्या प्रशासकीय पदावर काम करत असतानाच दिल्लीमधल्या मराठी वर्तुळातही ते सक्रीय असायचे.
दिल्लीच्या पहाडगंज मधली महाराष्ट्र भवनाची इमारत ही त्यावेळी स्थापन झालेल्या महाराष्ट्र स्नेहसंवर्धक समाजानं बांधलेली. दिल्लीतून महाराष्ट्रात आलेल्या लोकांना योग्य निवारा मिळावा, त्यांच्या खाण्यापिण्याची सोय व्हावी, शिवाय कायमस्वरुपी राहत असलेल्या लोकांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम व्हावेत या हेतूनं महाराष्ट्र स्नेहसंवर्धक समाजाची स्थापना झालेली होती.
अण्णासाहेब देवळालीकर या कामातही हिरीरीनं सहभागी व्हायचे. महाराष्ट्र स्नेहसंवर्धक समाजाच्या संस्थापक सदस्यांपैकी ते एक होते. शिवाय या कामासाठी दिल्लीत जागा शोधण्यात, संस्थेची इमारत बांधण्यात इतर सदस्यांसोबत त्यांनीही पुढाकार घेतला होता.
मराठी माणसाचं आणि दिल्लीचं अगदी इतिहासकाळापासूनचं नातं आहे. दिल्ली कायम मराठी माणसाला खुणावत आली आहे. पण अनेकजण इथे टिकू शकले नाहीत. दुर्दैव म्हणजे देवळालीकरांसारखे जे व्यक्ती इथे पाय रोवून उभे राहिले ते मराठीजनांच्या विस्मरणात गेले.
महाराष्ट्राबाहेर मराठी माणसाचं कर्तृत्व दाखवणाऱ्या व्यक्तींमध्ये देवळालीकरांचा नक्कीच समावेश होतो. म्हणूनच आजच्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं त्यांची दुर्लक्षित गाथा सर्वांसमोर आणण्याचा हा छोटासा प्रयत्न.
ब्रिटीशांनी राजधानी कोलकात्याहून दिल्लीला स्थलांतरित केली, तेव्हा हे शहर नव्यानं वसवायचं काम ब्रिटीश आर्किटेक्टसनी केलं. राष्ट्रपती भवन, इंडिया गेटसारख्या ऐतिहासिक वास्तू उभारुन ल्युटियन्सनं या वास्तुविशारदानं महत्वाचं योगदान दिलं होतं. ब्रिटीश सोडून गेल्यानंतर आजही देशाचा कारभार याच इमारतींमधून चालतो. याच कामाबद्दल कृतज्ञता म्हणून दिल्लीचा हा सगळा परिसर ल्युटियन्स दिल्ली म्हणून ओळखला जातो. पण भौगोलिकदृष्ट्या पाहिलं तर आत्ताच्या दिल्लीमधल्या अनेक इमारतींमागे देवळालीकरांचा हात आहे.
सुप्रीम कोर्ट, कृषी भवन, औद्योगिक भवन असो की नॅशनल म्युझियम. याशिवाय दिल्लीच्या जखमा भरुन काढणारी निर्वासितांची घरं. त्यामुळे आताची ही आधुनिक दिल्ली जितकी ल्युटियन्सची आहे तितकीच ती देवळालीकरांचीही आहे. फरक इतकाच की न्यायदेवतेचं मंदिर उभारणाऱ्या या वास्तुविशारदाच्या कामाला मात्र आपण न्याय देऊ शकलो नाही.