नवी दिल्ली :  जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल म्हणून काम करत असताना तीनशे कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न झाला होता असा खळबळजनक दावा सत्यपाल मलिक (Satya Pal Malik)  यांनी केला आहे. सत्यपाल मलिक हे जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल आहेत तर सध्या ते मेघालयमध्ये राज्यपाल आहेत. अंबानी आणि संघातल्या एका उच्चपदस्थ व्यक्तीच्या संदर्भात दोन फायली मंजूर करण्याच्या बदल्यात हा मोबदला मिळणार होता हा त्यांचा दावा आहे. मात्र कायद्यात न बसणारे कुठलेही काम आपण करणार नाही असं सांगत आपण ती ऑफर फेटाळल्याचे ते म्हणाले. त्यानंतर त्यांनी पुढे बोलताना पंतप्रधानांचे (PM Modi) ही कौतुक केलं.


पंतप्रधानांचे नाव घेऊन काही व्यक्ती हे काम करू पाहत होते त्यामुळे पंतप्रधानांच्या कानावर सुद्धा आपण ही गोष्ट घातली आणि त्यानंतर पंतप्रधानांनी सुद्धा आपल्याला कायद्यानुसारच काम करायला सांगितलं. कुठलाही भ्रष्टाचार खपवून घेऊ नका असं सांगितल्याचं मलिक म्हणाले. राजस्थानमधल्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हा दावा केला आहे. हे काम नेमके कुठल्या संदर्भातलं होते याचा उलगडा त्यांनी केला नसला तरी अनिल अंबानी यांच्या कंपनीचं हे काम असल्याचा दावा काही माध्यमातून केला गेला आहे. 



सत्यपाल मलिक हे आपल्या बेधडक बोलण्याने सातत्याने चर्चेत असतात. या आधी राज्यपाल पदावर असताना त्यांनी शेतकर्‍यांच्या आंदोलनाचं समर्थन केलं होतं. शेतकरी आंदोलन असंच चालू राहिलं तर आपण आपलं पद सोडून शेतकऱ्यांसोबत उभे राहू असं मलिक म्हणाले होते. काश्मीरमधल्या भ्रष्टाचाराबाबत ही त्यांनी थेट विधानं केली होती. देशातला सर्वात जास्त भ्रष्टाचार कश्मीरमध्ये असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. इतर राज्यांमध्ये पाच टक्के कमिशन मागितला जातं तर काश्मीर मध्ये थेट 15 टक्के कमिशन मागितला जातं असा आरोप राज्यपाल मलिक यांनी केला होता.