पाटणा : नितीश कुमार यांच्या नव्या सरकारचा आज शपथविधी होणार आहे. पाटणामध्ये आज सकाळी दहा वाजता नितीश कुमार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. फरक एवढाच असेल की, नितीश कुमार कालपर्यंत लालू प्रसाद यादव यांचा पक्ष राजदच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री होते. आज ते भाजपच्या मदतीने बिहारची सत्ता काबीज करतील.
नितीश कुमार यांनी काल (26 जुलै) मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. बिहारमध्ये झालेल्या नाट्यमय घडामोडींनंतर भाजपने नितीश कुमारांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे भाजपची बिहारच्या सत्तेत पुन्हा एन्ट्री होणार आहे. भाजपने नितीश कुमार यांना बिहारमध्ये नवीन सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा जाहीर केला आहे.
नितीश कुमार यांचा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
चार वर्षांनंतर बिहारमध्ये भाजपची एन्ट्री
बिहारच्या सत्ताकारणात भाजप चार वर्षांनंतर पुन्हा एन्ट्री घेत आहे. मुख्यमंत्रीपदी नितीश कुमार आज शपथ घेतील, तर उपमुख्यमंत्री म्हणून सुशील मोदी शपथ घेतील. तर इतर मंत्र्यांचा शपथविधी विधानसभेत उद्या बहुमत सिद्ध केल्यानंतर होईल. मंत्रिमंडळात भाजपचे 13 आणि जेडीयूचे 13 मंत्र्यांचा समावेश असेल.
नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांना भाजपचा पाठिंबा मिळेल, असा अंदाज लावला जात होता. अखेर तो अंदाज खरा ठरला आहे.
नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर बिहारमध्ये जदयू, राजद आणि काँग्रेसमध्ये 20 महिन्यांपूर्वी झालेली महाआघाडी तुटली.
राजीनाम्यानंतर नितीश कुमार यांची पहिली प्रतिक्रिया
नितीश कुमार यांचा राजीनामा
“बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासूनची जी परिस्थिती सुरु आहे, त्यामध्ये काम करणं अशक्य झालं आहे. लालू यादव आणि काँग्रेसशी परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी चर्चा केली, मात्र काहीही तोडगा निघाला नाही”, अशी प्रतिक्रिया नितीश कुमार यांनी राजीनाम्यानंतर दिली.
जेडीयूच्या आमदारांच्या बैठकीनंतर नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.
नितीश कुमार राजीनाम्याची माहिती देत असताना मोदींचं ट्वीट
नितीश कुमार राज्यपालांकडे राजीनामा देऊन बाहेर आले. माध्यमांना राजीनामा का दिला, याची माहिती देत असतानाच काही क्षणातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं अभिनंदन केलं. राजकीय मतभेद बाजूला ठेवून भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर एकत्र आल्याबद्दल मोदींनी नितीश कुमार यांना शुभेच्छा दिल्या.
कोण कुणाला फोडणार? बिहारचं राजकीय गणित काय असेल?
मोदी काय म्हणाले?
भ्रष्टाचाराविरोधातील लढाईत सहभागी झाल्याबद्दल नितीश कुमार यांचं अभिनंदन. देशाच्या आणि विशेषतः बिहारच्या उज्ज्वल भविष्यासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून भ्रष्टाचाराविरोधात एकत्र येऊन लढणं काळाची गरज आहे, असं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं.
नितीश कुमारांकडून मोदींचे आभार
एकीकडे मोदींनी नितीश कुमार यांचे आभार मानल्याची चर्चा सुरु असतानाच नितीश कुमार यांनी मोदींना धन्यवाद म्हटलं. राजीनाम्याच्या निर्णयाचं स्वागत केल्याबद्दल मी मोदींना मनापासून धन्यवाद देतो, असं ट्वीट नितीश कुमार यांनी केलं.
नितीश कुमार यांचा राजीनामा, मोदींकडून अभिनंदन!
नितीश कुमारांचा राजीनामा पूर्वनियोजित : लालू प्रसाद यादव
नितीश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राज्यपालांची भेट घेऊन नितीश कुमार यांनी राजीनामा सुपूर्द केला. मात्र नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी पत्रकार परिषद घेऊन नितीश कुमारांचा राजीनामा पूर्वनियोजित असून त्यांच्यावरील आरोपांमुळे आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचं म्हटलं आहे. तसंच देशातील अन्य कोणत्याही मुख्यमंत्र्यावर इतक्या गंभीर स्वरुपाचे आरोप नसल्याचंही लालू प्रसाद यादव यांनी म्हटलं आहे. त्यामुळे भाजपसोबत सेटिंग करत नितीश कुमारांनी राजीनामा दिल्याचा आरोपही लालू प्रसाद यादव यांनी केला.
नितीश कुमार यांची पहिली प्रतिक्रिया
मी कुणाला राजीनामा मागितला नाही. लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांना त्यांच्यावर लावण्यात येत असलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण देण्याची मागणी केली होती. मात्र असं काहीही झालं नाही. अशी परिस्थिती झाली की मी त्यामध्ये कामच करु शकत नव्हतो. त्यामुळे राजीनामा देण्याचा निर्णय घेतला, अशी प्रतिक्रिया नितीश कुमार यांनी राज्यपालांच्या भेटीनंतर दिली.
लालू प्रसाद यादव यांच्यावर होत असलेल्या सीबीआयच्या छापेमारीनंतर आणि अघोषित संपत्तीच्या कारवाईनंतर नितीश कुमार यांनी हा निर्णय घेतला.
बिहारमध्ये महायुतीचं सरकार आहे. ज्यामध्ये काँग्रेसही मित्र पक्ष आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याशीही चर्चा केली. मात्र काहीही तोडगा निघाला नाही, अशी माहिती नितीश कुमार यांनी दिली.
नितीश कुमार यांच्या राजीनाम्यामागील 10 कारणं
बिहार विधानसभेचं समीकरण
बिहार विधानसभेच्या 243 जागा आहे आणि सरकार स्थापन करण्यासाठी 122 जागांची आवश्यता आहे. पण बिहारमध्ये निवडणुकीआधी काँग्रेस, जदयू आणि राजदने महाआघाडी केली होती. निवडणुकीत राजदला सर्वाधिक 80 जागा, जदयूला 71 जागा तर काँग्रेसला 27 जागांवर विजय मिळाला आणि नितीश कुमार मुख्यमंत्री बनले होते.
आता नितीश कुमार भाजपसोबत सत्ता स्थापन करणार आहेत. जदयूच्या 71, भाजपच्या 53, एलजेपी 2, आरएलएसपी 2 आणि हमची एक जागा मिळून हा आकडा 129 पोहोचेल, जो बहुमतापेक्षा सातने जास्त आहे.
बिहार विधानसभेतील पक्षीय बलाबल (एकूण 243 सदस्य) :
आरजेडी (लालू) – 80
जेडीयू (नितीश कुमार) – 71
काँग्रेस – 27
भाजप – 53
सीपीआय – 3
लोक जनशक्ती पार्टी – 2
राष्ट्रीय लोक समता पार्टी – 2
हिंदुस्तानी अवाम मोर्चा – 1
अपक्ष – 4
बिहारमध्ये कोणत्याही परिस्थितीत मध्यावधी होऊ नये : भाजप
काय आहे नेमकं प्रकरण?
बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासह आरजेडी प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या मालमत्तांवर सीबीआयने छापेमारी केली होती.
या छापेमारीत तेजस्वी यादव यांच्याकडे बेहिशेबी मालमत्ता असल्याचं आढळून आलं होतं. त्यामुळे तेजस्वी यादव यांनी राजीनामा देण्याची मागणी जोर धरत होती.
दुसरीकडे लालू प्रसाद यादव यांनी राजदच्या आमदारांची बैठक घेऊन, तेजस्वी यादव पदाचा राजीनामा देणार नाहीत, असं जाहीर केलं. तर तेजस्वी यादव यांनी राजीनामा दिला नाही तर त्यांना बडतर्फ करण्याचा इशारा मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिला होता.
बिहारमध्ये जेडीयू, आरजेडी आणि काँग्रेसची युती आहे. या छापेमारीनंतर गेल्या काही दिवसांपासून नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादव यांचं बोलणंही बंद झालं होतं. त्याचा भाग म्हणून बिहारमध्ये झालेल्या एका सरकारी कार्यक्रमाला नितीश कुमारांची हजेरी होती, पण उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी दांडी मारली होती.
संबंधित बातम्या
नितीश कुमारांचा राजीनामा पूर्वनियोजित : लालूप्रसाद यादव
राजीनामा ते सत्ताबदल, बिहारमधील मोदी-नितीश पर्वाचे 3 तास
बिहारमध्ये मोदी-नितीश पर्व, नितीश कुमार सरकार स्थापनेचा दावा करणार