नितीश कुमार यांच्या राजीनाम्यामागील 10 कारणं
- आरजेडी प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे पुत्र आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर हॉटेल घोटाळ्याचा आरोप झाला. त्यानंतर भाजपने सातत्याने नितीश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. आजच्या राजकीय भूकंपाची सुरुवात इथूच सुरु झाली होती.
- तेजस्वी यादव यांच्या राजीनाम्याची मागणी जेडीयूकडूनही झाली होती. याच मुद्द्यावरुन आरजेडी आणि जेडीयूमधील संबंध ताणले गेले. दोन्ही पक्षांकडून टोकाची विधानंही समोर आली.
- आधीच जेडीयू आणि आरजेडीमध्ये तणाव होता. त्यात नितीश कुमार यांनी लालूप्रसाद यादव यांना विश्वासात न घेताच एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा दिला.
- राजीनामा न देण्यावर तेजस्वी यादव कायम होते. एवढंच नव्हे, तर तेजस्वी यादव यांनी आपल्यावरील आरोपांचं स्पष्टीकरणही दिलं नाही.
- लालूप्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांच्या भूमिकेबाबत नितीश कुमार यांनी दिल्लीत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचीही भेट घेऊन चर्चा केली. मात्र, या चर्चेचाही काहीच फायदा झाला नाही.
- आरजेडीच्या आमदारांची बुधवारी बैठक झाली. यानंतर लालूप्रसाद यादव यांनी भूमिका जाहीर केली की, तेजस्वी यादव राजीनामा देणार नाहीत आणि ते स्पष्टीकरणही देणार नाहीत.
- तेजस्वी यादव स्वत:हून राजीनामा देणार नाहीत, हे स्पष्ट होतं. दुसरीकडे, तेजस्वी यादव यांची उपमुख्यमंत्रिपदावरुन हकालपट्टी करणं, नितीश कुमार यांना राजकीयदृष्ट्य फायदेशीर नव्हतं. कारण तसं झालं असतं, तर लालूप्रसाद यादव यांनी याचा राजकीय फायदा उचलला असता. त्यामुळे नितीश कुमार यांच्याकडे दुसरा कोणताच मार्ग नव्हता.
- नितीश कुमार हे स्वच्छ प्रतिमेचे नेते म्हणून ओळखले जातात. मात्र, मंत्रिमंडळातील महत्त्वाच्या मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने, त्यांच्याच प्रतिमेवर प्रश्न उपस्थित होऊ लागले. आपली स्वच्छ प्रतिमा जपणं, हे नितीश कुमार यांच्यासमोरील मोठं आव्हान होतं.
- बिहारमध्ये सुशासनाच्या घोषणेवर विजय प्राप्त करणारे नितीश कुमार यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांसोबत सरकार चालवणं तसंही कठीण होत चाललं होतं. कारण त्यांच्या मंत्रिमंडळातील उपमुख्यमंत्र्यांवरच भ्रष्टाचाराचे आरोप होते.
- सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे नितीश कुमार हे आपली स्वच्छ प्रतिमा जपू पाहत होते. आपल्या स्वच्छ प्रतिमेसाठी मुख्यमंत्रिपदाचीही त्यांना पर्वा नव्हती. आताही राजीनामा देत त्यांनी हाच संदेश दिला आहे की, पदासाठी तत्त्वांची तडजोड केली जाणार नाही.