Behind Boycott Maldives Hashtag : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) म्हणजे आधीच्या ट्विटरवर (Twitter) बॉयकॉट मालदीव (Boycott Maldives) हॅशटॅग (Hashtag) ट्रेंड होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलिकडेच लक्षद्वीपला भेट दिली. या दौऱ्यातील काही फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले. पंतप्रधान मोदींनी काही दिवसांपूर्वीच ‘लँड ऑफ कोरल्स’ लक्षद्वीपला भेट दिला. यानंतर भारताचा सुंदर समुद्रकिनारा लक्षद्वीप चर्चेत आलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये ते स्नॉर्कलिंग करताना दिसत होते. यासोबत पांढऱ्या वाळूवर चालताना आणि समुद्रकिनाऱ्यावर विश्रांती घेतानाचे फोटोही पंतप्रधानांनी शेअर केले होते. पंतप्रधानांची ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर लगेचच, भारतात लक्षद्वीप ट्रेंड होऊ लागला.


पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर बॉयकॉट मालदीव हॅशटॅग ट्रेंडमध्ये


पंतप्रधानांची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर लक्षद्वीप हा भारतात गुगलवर सर्वाधिक शोधला जाणारा दहावा शब्द बनला. पंतप्रधानांचे फोटो पाहून नेटकऱ्यांनी लक्षद्वीपबद्दल माहिती शोधण्यास सुरुवात केली. इतकंच काय तर, नेटिझन्सने लक्षद्वीपची मालदीवशी (Maldives) तुलना करण्यास सुरुवात केली. यानंतर अनेक नेटिझन्सने कमेंट करत सांगितलं की, लक्षद्वीपचा समुद्रकिनारा सुट्टीसाठी मालदिवपेक्षा चांगला पर्याय असू शकते. अलिकडच्या काळात सेलिब्रिटी आणि दिग्गज नेते मंडळींसह अनेक नागरिक सुट्ट्यांसाठी मालदिवला पसंती देताना दिसतात. त्यामुळे मालदीवला प्रसिद्धी मिळाली आहे.


मालदीवच्या खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य


दरम्यान, भारतीय बेटाची वाढती चर्चा आणि लोकप्रियता मालदीवच्या एका खासदाराला मात्र पटली नाही. मालदीवचे खासदार जाहिद रमीझ यांनी पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्याच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना सांगितलं की, त्यांच्याशी स्पर्धा करण्याची कल्पना एक भ्रम आहे. झाहिद रमीझ यांनी X वर वादग्रस्त कमेंट केली की, "खोल्यांमधील कायमचा वास हा भारतासाठी सर्वात मोठी पडझड असेल". यानंतर लक्षद्वीपबाबत केलेल्या या वादग्रस्त टिप्पणीबद्दल एका भारतीय ट्विटर युजरने मालदीवच्या राजकारण्याला फटकारलं. 


लक्षद्वीप प्रमुख पर्यटन स्थळ बनवण्याची सरकारची योजना


मालदीव हे प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक असू शकतं, पण पंतप्रधान मोदी यांनी लक्षद्वीप दौऱ्याद्वारे केंद्रशासित प्रदेशाच्या पर्यटन संभावनांना चालना दिली आहे. याचा उद्देश लक्षद्वीपचा विकास होऊन तेथील लोकांचं जीवन सुधारण्यावर आहे. लक्षद्वीपला मालदीवसारखे प्रमुख पर्यटन केंद्र बनवण्याची केंद्र सरकारची योजना आहे. मोदी सरकारने लक्षद्वीपच्या पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी 1,150 कोटी रुपयांहून अधिक खर्च केला आहे. लक्षद्वीप हे मालदीवच्या अगदी उत्तरेस, भारताच्या मुख्य भूभागाच्या पश्चिमेस 400 किलोमीटर अंतरावर आहे.