Ayodhya Ram Temple : अयोध्येत भव्य राम मंदिरात रामलल्लाची (Ramlalla) प्रतिष्ठापना (Pran Pratishta) सोहळ्याची जोरदार तयारी सुरु आहे. 15 जानेवारीपासून राम मंदिरात विविध कार्यक्रम आणि विधींना सुरुवात होणार आहे. 16 जानेवारीपासून रामलल्लाची म्हणजेच प्रभू श्रीरामाच्या बालस्वरूप मूर्तीची पूजा सुरू होणार आहे. त्यानंतर 18 जानेवारीला गाभाऱ्यात रामलल्लाची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. भगवान रामाची मूर्ती बालस्वरुपात साकारण्यात आली आहे. या मूर्तीची उंची 51 इंच आणि वजन 1.5 टन आहे.


रामलल्लाचं मनमोहक, निरागस बालस्वरूप


प्रभू श्रीराम यांचं बालपणीचं निरागस स्वरूप आणि भाव या मूर्तीत उतरवण्यात आले आहेत. भगवान रामाची मूर्ती 51 इंच उंच, 1.5 टन वजनाची असून त्यामध्ये लहान मुलाचं निरागस रूप आहे. राम मंदिराच्या गर्भगृहात स्थापना करण्यात येणारी रामलल्लाची मूर्ती कर्नाटकातील शिल्पकार अरुण योगीराज आणि गणेश भट्ट यांनी तयार केलेली कृष्णवर्णीय आणि उभ्या स्थितीत असेल. या मूर्तीची उंची 51 इंच असेल. ही मूर्ती गडद काळ्या कर्नाटक ग्रॅनाइट दगडापासून बनवण्यात आली आहे. मूर्तीमध्ये वापरण्यात आलेल्या दगडावर पाणी किंवा दुधाचा कोणताही परिणाम होणार नाही. मूर्ती कमकुवत होऊ नये म्हणून मूर्तीमध्ये लोखंडाचा वापर करण्यात आलेला नाही.


तीन मूर्तीमधील एकाची निवड


तीन मूर्तिकारांनी भगवान श्रीरामाच्या तीन मूर्ती स्वतंत्रपणे बनवल्या, त्यापैकी 1.5 टन वजनाची आणि 51 इंच लांबीची मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी निवडण्यात आली. रामलल्लाच्या तीन मूर्ती बनवण्यामागचं कारण म्हणजे रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेवेळी चुकून मूर्ती खंडीत झाल्यास मूर्तीसाठी दुसरा पर्याय म्हणून दुसरी मूर्ती बनवण्यात आली. तर तिसरी बनवण्यामागचं कारण म्हणजे, रामलल्लाचे वस्त्र आणि अलंकार यांचं माप घेण्यासाठी गर्भगृहात स्थापन केलेल्या मूर्तीचं माप घेण्याऐवजी तिसरी मूर्ती बनवून त्याच्या आधारे वस्त्र आणि अलंकार बनवत येतील.


रामनवमीला सूर्यकिरण रामलल्लावर पडणार


प्रभू श्रीरामांचं ही बालरुपातील मूर्ती अतिशय मनमोहक आहे. या मूर्तीवर पाणी, दूध आणि यांचा मूर्तीवर कोणताही परिणाम होणार नाही, अशी माहिती राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी दिली आहे. दरवर्षी रामनवमीच्या दिवशी दुपारी 12 वाजता सूर्यकिरण रामलल्लाच्या मूर्तीच्या कपाळावर पडतील, अशा प्रकारे या मंदिराची रचना करण्यात आली आहे. असंही चंपत राय यांनी सांगितलं. 


"भगवान श्रीरामाच्या मूर्तीची लांबी आणि स्थापनेची उंची भारतातील प्रख्यात अंतराळ शास्त्रज्ञांच्या सल्ल्यानुसार अशा प्रकारे तयार करण्यात आली आहे की, दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला रामनवमीला सूर्य दुपारी 12 वाजता सूर्यकिरण थेट रामलल्लाच्या कपाळावर पडतील म्हणून श्री रामाला अभिषेक करतील." असं चंपत राय म्हणाले.


1000 वर्षाहून अधिक काळ ऊन, वाऱ्याशी लढणार राम मंदिर


या मंदिराची रचना नागरशैलीत करण्यात आली असून मंदिराची वास्तुकला दक्षिण भारतातील मंदिरांपासून प्रेरित आहे, असं चंपत राय यांनी सांगितलं. बांधकाम अभियंत्यांच्या मते, गेल्या 300 वर्षांत उत्तर भारतात असं कोणतेही मंदिर बांधले गेलेलं नाही. या भव्य राम मंदिरावर सुमारे 1000 वर्षे सूर्यप्रकाश, वारा आणि पाण्याचा कोणताही परिणाम होणार नाही कारण त्याखाली ग्रॅनाइटचा थर बसवण्यात आला आहे. मंदिराच्या बांधकामात लोखंडाचा वापर केलेला नाही. राम मंदिरासाठी वापरण्यात आलेल्या दगडाचे वय 1000 वर्षे आहे. सूर्यप्रकाश, वारा आणि पाणी यावर परिणाम करू नये आणि ओलावा शोषून घेण्यास प्रतिबंध करण्यासाठी दगडाखाली ग्रॅनाइट बसवण्यात आलं आहे.