Nashik News : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे भारतातील अनेक विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले होते. आता जवळपास सर्वच विद्यार्थी भारतात परतले असून अनेकांना घरी परतण्यासाठी मोठी धडपड करावी लागली. पण या सर्वामध्येच नाशिकच्या एका विद्यार्थ्याने 'मी घरी जाईन तर आपल्या डेल्टा या पाळीव श्वानाला घेऊनच जाईन' असा निश्चय केला होता. जो अखेर स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, सर्वतोपरी प्रयत्न करत त्याने पूर्णही केला. संबधित तरुण हा श्वानाचा पासपोर्ट येई पर्यंत युक्रेनमध्येच मुक्काम करत होता. ज्यानंतर आता तो नाशिकला परतला आहे.
नाशिक शहरातील मखमलाबाद परिसरात राहणारा बावीस वर्षीय रोहन अंबुरे हा तरुण गेल्या सहा वर्षांपासून युक्रेनच्या ओडीशी या शहरात एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. दोनच वर्षांपूर्वी सार्बेरियन हस्क जातीचा श्वान त्याने खरेदी केला होता, त्याचे नाव त्याने डेल्टा असे ठेवले होते. हळूहळू डेल्टाचा त्याला एवढा लळा लागला होता की डेल्टा शिवाय घराबाहेर पडणंही त्याला अवघड झालं होतं. सर्व काही सुरळीत सुरु असतानाच अचानक युक्रेन आणि रशियामध्ये तणाव वाढला आणि सर्व भारतीय विद्यार्थ्याचे घरी जाण्यासाठी धावपळ सुरु झाली. अनेकांनी आपले पाळीव प्राणी युक्रेनमध्येच सोडून पळ काढला मात्र रोहनचा डेल्टा शिवाय घराबाहेर पाय निघत नव्हता. शेवटी त्याने डेल्टाचा पासपोर्ट काढला, त्याचे सर्व प्रकारचे लसीकरण केले आणि कडाक्याच्या थंडीत कधी कड्यावर घेत पायपीट करत तर कधी मांडीवर बसवत प्रवास करत २८ फेब्रुवारीला युक्रेनवरून निघालेला रोहन ६ मार्चला सकाळी डेल्टासह नाशिकला आपल्या घरी पोहोचला. डेल्टाचं विमान तिकीट काढण्यासाठी रोहनने 23 हजार रुपयेही खर्च केले. दरम्यान रोहन आणि डेल्टा सुखरूप घरी परतल्याने त्याच्या कुटुंबाचा आनंद गगनात मावत नव्हता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Ukraine-Russia War: पत्नीला खोटं बोलून घरातून निघाला, अन् युक्रेन सैन्यात सामील झाला
- Russia Ukraine War : दोन अमेरिकन शास्त्रज्ञ अनेक महिन्यांपासून रशियन कॅप्सूलमध्ये बंद, बाहेर सुरु असलेल्या युद्धाची कल्पनाच नाही
- Ukraine Russia War : सुमी शहरातील विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी भारतीय दूतावासाची योजना, भारतीयांना तयार राहण्याच्या सूचना
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha