मुंबई : शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या 'रेमंड'च्या विजयपथ सिंघानिया यांना मानद अध्यक्षपदावरुन हटवण्यात आलं आहे. अध्यक्षपदावरुन निवृत्ती घेतल्यानंतर सिंघानिया यांना मानद अध्यक्षपद देण्यात आलं होतं. मुलगा गौतम सिंघानियासोबत वितुष्ट आल्यामुळे आपलं पद काढून घेतल्याचा आरोप विजयपथ सिंघानियांनी केला आहे.


विजयपथ सिंघानिया यांनी जवळपास वीस वर्ष 'रेमंड कंपनी'च्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती. कंपनीला दिलेल्या योगदानासाठी त्यांना निवृत्तीनंतर 'चेअरमन एमिरेट्स' अर्थात मानद अध्यक्षपद बहाल करण्यात आलं होतं.

गेल्या काही दिवसांपासून विजयपथ सिंघानिया यांचे पुत्र गौतम सिंघानियांसोबत वाद सुरु होते. 'माझी चित्रं आणि पद्मभूषण पुरस्काराचं पदक मला आणून द्यावं' अशी मागणी करणारं पत्र विजयपथ सिंघानियांनी कंपनीला लिहिलं होतं. त्यानंतर त्यांचं मानद अध्यक्षपद काढून घेण्यात आल्याचं पत्र एका पदाधिकाऱ्याने त्यांना लिहिलं.

रेमंड कंपनीचं संचालक मंडळ जोपर्यंत मला याविषयी माहिती देत नाही, तोपर्यंत मी हे मान्य करणार नाही, असा पवित्रा विजयपथ यांनी घेतला आहे.

कंपनीला लिहिलेल्या पत्रात विजयपथ सिंघानियांनी आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप रेमंड कंपनीच्या संचालक मंडळाने केला आहे. विजयपथ हे कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सना गेल्या काही दिवसांपासून तुच्छ वागणूक देत असल्याचंही बोर्डाचं म्हणणं आहे. यामुळेच त्यांच्याकडून हे पद काढून घेतलं असल्याचा खुलासा रेमंडच्या वतीने करण्यात आला आहे.

बापलेकातील भांडणाचा पद काढून घेण्याच्या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, असा दावा गौतम सिंघानिया यांनी केला आहे. विजयपथ यांचं मानद पद काढून घेण्याचा निर्णय सर्वस्वी रेमंडच्या बोर्डाचा होता आणि त्या निर्णयाशी माझा काहीच संबंध नाही. बोर्डाच्या निर्णयांमध्ये मी ढवळाढवळ करत नाही, असं स्पष्टीकरण गौतम सिंघानियांनी दिलं.