चेन्नई : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शांततेचा ‘नोबेल’ पुरस्कार मिळावा, अशी इच्छा तामिळनाडू भाजपच्या प्रदेशाध्यक्षा तामिळसाई सुंदरराजन यांनी व्यक्त केलीय. मोदींनी ‘आयुष्मान भारत’ ही जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना आणली, असे कौतुक करत सुंदरराजन यांनी मोदींना 'नोबेल पुरस्कार' मिळावा म्हणून अर्ज दाखल केला आहे.

तामिळसाई सुंदरराजन यांचे पती प्रा. डॉ. पी. सुंदरराजन यांनीही मोदींचं नाव नोबेलच्या नामांकन अर्जातून सूचवले आहे. प्रा. डॉ. पी. सुंदरराजन हे खासगी विद्यापीठात नेफ्रॉलॉजी विभागाचे प्रमुख आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष तामिळसाई सुंदरराजन यांनी यासंदर्भात प्रसिद्धी पत्रक काढलं आहे.

पंतप्रधानांच्या दूरदृष्टीकोनातून सत्यात उतरलेल्या 'आयुष्मान भारत' योजनेमुळे लाखो लोकांचं आयुष्यात बदलेल, असेही तामिळसाई सुंदरराजन यांनी म्हटलंय. विद्यापीठातील प्राध्यापक आणि संसदेतील सदस्यांनीही पंतप्रधान मोदींचं नाव सूचवावं, असं आवाहनही सुंदरराजन यांनी केलंय.


2019 च्या शांततेच्या नोबल पुरस्कारासाठी 31 जानेवारी 2019 पर्यंत नामांकन अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. सप्टेंबर महिन्यात नामांकन प्रक्रिया सुरु होते.

दिवंगत शास्त्रज्ञ आल्फ्रेड नोबेल यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी ‘नोबेल’ पुरस्कार दिला जातो. वैद्यकीय, शैक्षणिक, साहित्य, सामाजिक कार्य, शांतता यासह विविध क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांची दखल घेऊन, त्यांना त्या त्या क्षेत्रातील नोबेल पुरस्कार प्रदान केला जातो. 1901 पासून नोबेल पुरस्कार देण्यास सुरुवात झाली.

नोबेलने गौरवण्यात आलेले भारतीय :

आतापर्यंत पाच भारतीयांना नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. शांततेचं नोबेल मदर तेरेसा आणि कैलाश सत्यर्थी यांच्या रुपाने दोन भारतीयांना आतापर्यंत प्रदान करण्यात आलंय.

  • 1913 - रवींद्रनाथ टागोर (साहित्य)

  • 1930 – सी. व्ही. रामण (फिजिक्स)

  • 1979 – मदर तेरेसा (शांतता)

  • 1998 - अमर्त्य सेन (अर्थशास्त्र)

  • 2014 – कैलाश सत्यर्थी (शांतता)