नवी दिल्ली : राहुल गांधींच्या नागरिकत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांच्या याचिकेवर आता दिल्ली उच्च न्यायालय सुनावणी करणार आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी दाखल केलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालायने रोस्टर बेंचसमोर ठेवली आहे. राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द करण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने द्यावेत, त्यासाठी उच्च न्यायालयाने त्यांना आदेश द्यावा अशा आशयाची याचिका सुब्रमण्यम स्वामी यांनी दाखल केली आहे. 


दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलंय की, राहुल गांधींच्या नागरिकत्वाबाबत त्यांनी गृहमंत्रालयाकडे पाच वर्षांपूर्वी तक्रार केली होती. मात्र गृहमंत्रालयाने या प्रकरणी काय निर्णय किंवा कारवाई केली हे अद्याप स्पष्ट केलेले नाही. त्यासाठी त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आतापर्यंत केलेल्या कारवाईबाबत न्यायालयाने गृहमंत्रालयाकडून स्टेटस रिपोर्ट मागवावा असे स्वामी यांचे म्हणणे आहे.


 






काय आहे प्रकरण?


भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी ब्रिटिश नागरिक असल्याचा दावा केला आहे. यासाठी त्यांनी एक दस्तऐवज शेअर करून हा आरोप केला होता. राहुल गांधींनी ब्रिटिश सरकारकडे दाखल केलेले इन्कम टॅक्स रिटर्न उपलब्ध आहे असा दावा सुब्रमण्यम स्वामींनी केला आहे. 


सुब्रमण्यम स्वामी यांनी आरोप केला की राहुल गांधी हे भारतीय नागरिक नसल्याने त्यांनी भारतीय नागरिकत्व कायदा 1955 मधील भारतीय संविधानाच्या कलम 9 चे उल्लंघन केले आहे. स्वामींनी दावा केला की, गांधी हे भारतीय नागरिक नाहीत. कारण, भारतीय राज्यघटनेच्या कलम 9 मध्ये असे नमूद केले आहे की, एखाद्याने स्वेच्छेने कोणत्याही परकीय राज्याचे नागरिकत्व प्राप्त केले असेल तर त्याला भारताचे नागरिक मानले जाणार नाही.


ही बातमी वाचा: