Ram Shankar Katheria Sentenced: उत्तर प्रदेशातील भाजप खासदार रामशंकर कठेरिया (Ram Shankar Katheria) यांना आग्रा येथील कोर्टाने 12 वर्ष जुन्या प्रकरणात दोषी ठरवलं आहे. एमपी-एमएलए कोर्टाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. कठेरिया यांच्यावर 2011 मध्ये वीज पुरवठा कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप आहे. आता कोर्टाच्या आदेशानंतर ते लोकसभेतून (Loksabha) अपात्र होण्याची शक्यता आहे.
खासदारकी धोक्यात
रामशंकर कठेरिया हे उत्तर प्रदेशातील इटावा येथील विद्यमान लोकसभा सदस्य आहेत. राम शंकर कठेरिया यांना कलम 147 आणि 323 अंतर्गत दोषी ठरवण्यात आलं आहे आणि दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कोणत्याही गुन्ह्यासाठी दोन वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षा झालेल्या लोकप्रतिनिधीला 1951 कायद्याअंतर्गत अपात्रतेच्या कारवाईला सामोरं जावं लागतं. त्यामुळे रामशंकर कठेरिया यांची खासदारकी जाण्याची शक्यता आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
साकेत मॉलमधील टोरंट कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड करून गोंधळ घातल्याचा आणि वीज कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप भाजप खासदारावर करण्यात आला होता. 16 नोव्हेंबर 2011 रोजी ही घटना घडली होती. या प्रकरणी राम शंकर कठेरिया यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली असून 50 हजारांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. त्यामुळे राम शंकर कठेरिया यांची खासदारकी जाऊ शकते, त्यांचं संसदेचं सदस्यत्व संपुष्टात येऊ शकतं.
काय म्हणाले राम शंकर कठेरिया?
शिक्षेवर प्रतिक्रिया देताना कठेरिया म्हणाले, "मी नेहमीप्रमाणे कोर्टात हजर झालो. कोर्टाने आज माझ्याविरुद्ध निकाल दिला आहे. मी न्यायालयाचा आदर करतो आणि दिलेला निर्णय स्वीकारतो. पुढे अपील करण्याचा अधिकार मला आहे आणि मी त्याचा वापर करेन."
कोण आहेत राम शंकर कठेरिया?
राम शंकर कठेरिया हे उत्तर प्रदेशातील इटावा येथून भाजपचे खासदार आहेत. नोव्हेंबर 2014 ते जुलै 2016 या काळात त्यांनी मनुष्यबळ विकास मंत्रालयात केंद्रीय राज्यमंत्री म्हणून काम केलं. ते राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्षही राहिले आहेत. कठेरिया हे संरक्षणविषयक संसदीय स्थायी समिती आणि गृह मंत्रालयाच्या सल्लागार समितीचे सदस्य आहेत.
2019 मध्ये आग्रा येथील टोल प्लाझा कर्मचार्यांवर हल्ला केल्याप्रकरणी कठेरियांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्या अंगरक्षकांनी टोल प्लाझा कर्मचाऱ्यांना मारहाण केली आणि हवेत गोळ्या झाडल्या. हा हल्ला टोल प्लाझाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता, पण भाजप नेत्यानेच टोल प्लाझाच्या कर्मचाऱ्यांवर आरोप केला होता. कर्मचाऱ्यांनीच सुरक्षा रक्षकांवर हल्ला केल्याचं त्यांनी म्हंटलं होतं आणि त्याला स्वसंरक्षणार्थ सुरक्षा रक्षकांनी गोळीबार केल्याचं ते म्हटले होते.
हेही वाचा:
NDA Vs INDIA : विरोधकांच्या 'इंडिया'ची मुंबईत बैठक, उद्धव ठाकरे गटाकडे जबाबदारी