नवी दिल्ली : अयोध्येतील राममंदिर भूमीपूजनाला काही तास उरलेले असताना भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रतिक्रिया आली आहे. माझ्या हृदयाच्या जवळील एक स्वप्न पूर्ण होत आहे, असं लालकृष्ण अडवाणी यांनी म्हटलं आहे.


राममंदिर आंदोलनातील लालकृष्ण अडवाणी प्रमुख चेहरा होते. लालकृष्ण अडवाणी यांनी म्हटलं की, जीवनात काही स्वप्न पूर्ण व्हायला खूप वेळ लागतो. माझ्या हृदयाच्या जवळील एक स्वप्न होतं, ते पूर्ण होत आहे. अयोध्या येथे राम जन्मभूमीवर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन होत आहे. निश्चित हे माझ्याच नाही देशातील करोडो लोकांसाठी हा ऐतिहासिक क्षण आहे.



श्री रामजन्मभूमी येथे भव्य राम मंदिर बांधणे हे भारतीय जनता पार्टीचं स्वप्न आणि मिशन आहे. भाजपने मला 1990 मध्ये रामजन्मभूमी चळवळीच्या वेळी सोमनाथ ते अयोध्या या रथ यात्रेची जबाबदारी दिली होती. या प्रवासाने असंख्य लोकांच्या आकांक्षा, ऊर्जा प्रेरित केल्या. याप्रसंगी राम मंदिर चळवळीत मोलाचे योगदान देणाऱ्या, बलिदान देणाऱ्या, सर्व संतांचे, नेत्यांची आणि लोकांची मी कृतज्ञता व्यक्त करतो, असं लालकृष्ण अडवाणी यांनी म्हटलं.


अयोध्येच्या लोकांमध्ये उत्साह


आपण जशी दिवाळी साजरी करतो तसं सध्या अयोध्येत वातावरण पाहायला मिळतंय. घरांना रंगेबीरंग कलर, साफसफाई, दुकानांमध्ये गर्दी तसेच प्रत्येक जण या भूमिपूजनाच्या मुर्हुतावर आनंद साजरा करण्यासाठी मिठाईच्या दुकानांकडे रांग लावतोय. अयोध्येत पंतप्रधान नरेद्र मोदींच्या पोस्टरबरोबर सगळीकडे भगवे झेंडे फडकताना दिसत आहेत. तसेच जो तो रामभक्त आपल्या गाडीवर किंवा घरावर प्रभू रामचं, हनुमानाचं चित्र असलेला झेंडा लावताना मग्न आहे.




संबंधित बातम्या