Manipur Violence: मणिपूरमधील (Manipur) व्हायरल व्हिडिओमुळे (Viral Video) संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. देशातील प्रत्येक कोपऱ्यातून यावर प्रतिक्रिया येत आहेत. यावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banrejee) यांनी देखील ट्वीट करत प्रतिक्रिया दिली होती. यावर भाजपचे नेते अमीत मालवीय यांनी देखील ट्वीट करत उत्तर दिलं आहे. अमित मालवीय (Amit Malviya) यांनी ट्वीट करत पश्चिम बंगालमध्ये पंचायत समितीमध्ये झालेल्या हिंसाचाराचा उल्लेख केला आहे. तसेच तुम्हाला लाज वाटते का असा सवाल विचारत त्यांनी ममता बॅनर्जींवर हल्लाबोल केला आहे.
काय म्हटलं अमित मालवीय यांनी?
अमित मालविय यांनी ममता बॅनर्जींच्या ट्वीटला उत्तर देत प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये त्यांनी पश्चिम बंगलामध्ये झालेल्या पंचायत समितीच्या हिंसाचाराचा संदर्भ दिला आहे. त्यांनी म्हटलं की, 8 जुलै 2023 रोजी पंचायत निवडणुकीच्या दिवशी एका महिला उमेदवाराला मारहाण करण्यात आली. हावडा येथे तिची विवस्त्र धिंड काढली गेली. तिचे कपडे फाडण्यात आले. असा खळबळजनक खुलासा अमित मालवीय यांनी केला आहे. तेव्हा पोलीस तक्रार देखील नोंदवून घेत नव्हते. भाजपने आग्रह केल्यानंतर तुमच्या पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यावेळी गृहमंत्री म्हणून तुम्ही कायदा आणि सुव्यवस्था राखणं गरजेचं होतं असं म्हणत त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
पुढे त्यांनी म्हटलं आहे की, 'तुम्ही एक अपयशी मुख्यमंत्री आहात त्यामुळे तुम्ही बंगालवर लक्ष केंद्रित करा असा सल्ला देखील त्यांनी ममता बॅनर्जी यांना दिला आहे. तसेच तुमचे तुटलेले हृदय, आक्रोश आणि न्यायाची खोटी चिंता न करता हे जग खूप चांगले आहे असं म्हणत अमित मालविया यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर टीकास्र सोडलं आहे. '
काय म्हणाल्या होत्या ममता बॅनर्जी?
मणिपूरमधील व्हिडीओ पाहून अत्यंत वाईट वाटल्याचं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना त्यांनी म्हटलं आहे की, "महिलांवर होणारा अत्याचार, त्यांना होणाऱ्या वेदना या शब्दात व्यक्त करता नाही येणार. हे कृत्य मानवतेच्या पलिकडे आहे. समाजकंटकांच्या अशा अमानवी कृत्यांचा निषेध करण्यासाठी आणि पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण एकजुटीने उभे राहिले पाहिजे."
मणिपूरच्या घटनेवर संपूर्ण देशातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेl. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील यावर प्रतिक्रिया देत ही घटना लज्जास्पद असल्याचं म्हटलं होतं. तसेच संसदेच्या पावसाळी अधिवेशनात देखील विरोधकांनी या मुद्द्यावरुन एकच गदारोळ केला. तसेच मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी देखील या घटनेनंतर जोर धरु लागली आहे. त्यामुळे आता मणिपूरमध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सरकार कोणती कठोर पावलं उचलतं हे पाहणं महत्त्वाचं आहे.