Parliament Monsoon Session 2023 : मणिपूरमध्ये (Manipur) महिलांची विवस्त्र धिंड काढण्यात आल्याच्या घटनेमुळे संपूर्ण देशभरात एकच खळबळ माजली आहे. समोर आलेल्या या व्हिडीओमुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या (Parliament Monsoon Session) पहिल्याच दिवशी या मुद्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घमासान झाल्याचं पाहायला मिळालं आहे. विरोधी पक्षातील नेत्यांनी एकजूट करत मणिपूरच्या मुद्द्यावरुन सरकाराला घेरलं. तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी तर ओरडत 'पंतप्रधान मोदी कुठे आहेत?' असा सवाल केला. 


नियम 267 चा हवाला देत ब्रायन यांनी सर्व कामकाज स्थगित करुन केवळ मणिपूरच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी केली. यावर बोलताना ब्रायन म्हणाले की, "मणिपूरच्या मुद्द्यावर तातडीने चर्चा करण्याची गरज आहे. त्यामुळे नियम 267 अंतर्गत इतर कोणतेही कामकाज निलंबित केले जाऊ शकते. म्हणजेच सभागृहात इतर कोणतेही कामकाज करता येणार नाही." 


पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र


ब्रायन यांनी पुढे म्हणाले की, 'आम्हाला मणिपूरच्या मुद्द्यावर चर्चा  करायची आहे आणि पंतप्रधान मोदी यांना मौन सोडावे लागेल." "कोणतेही पंतप्रधान या मुद्द्यावर गप्प कसे काय राहू शकतात," असा सवाल देखील त्यांनी यावेळी विचारला.' 


 पंतप्रधान मोदी यांनी संसदेच्या बाहेर मणिपूर प्रकरणावर प्रतिक्रिया देत ही घटना लज्जास्पद असल्याचं म्हटलं. पण यावर विरोधकांनी प्रतिक्रिया देत म्हटलं की, "पंतप्रधान मोदी यांनी संसदेच्या बाहेर यावर प्रतिक्रिया दिली आहे हे आम्हाला अजिबात आवडलं नाही, त्यांनी संसदेत येऊन यावर प्रतिक्रिया द्यावी अशी आमची मागणी आहे." काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राज्यसभेचे खासदार यांनी देखील या मु्द्द्यावरुन पंतप्रधान मोदी आणि सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले की, "मणिपूर जळत असताना, महिलांवर अत्याचार होत असताना पंतप्रधान मोदी मात्र मौन बाळगून आहेत."


अधिवेशन सुरु होण्यापूर्वी मोदी काय म्हणाले होते?


मणिपूरच्या एका घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे. यावर विरोधकांनी सुरु झालेल्या पावसाळी अधिवेशनात चांगलच घेरलं. तर ही घटना लज्जास्पद असून दोषींवर कठोर कारवाई करु अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मोदी यांनी संसदेचं पावसाळी सुरु होण्याआधी दिली आहे. त्याचप्रमाणे याप्रकरणात चार जणांना मणिपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर इतर आरोपींची ओळख पटवण्याचे काम सध्या मणिपूर पोलीस करत आहेत. या प्रकरणी तपास सुरू असून लवकरच सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात असतील असं मुख्यमंत्री एन बिरेन सिंह सांगितलं आहे. या प्रकरणामुळे मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील जोर धरत आहे. 


हे ही वाचा : 


Manipur Violence : मणिपूर महिला विवस्त्र धिंड व्हिडीओ प्रकरणी दोन जण ताब्यात, इतरांचा शोध सुरू