लखनऊ: उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा भाजपने बाजी मारली आहे. पण याचे सर्वात मोठं दु:ख हे मैनिपुरी जिल्ह्यात राहणाऱ्या एका 32 वर्षीय युवकाला झालं आहे. भाजप सत्तेत आल्यामुळे आपल्याला आता नोकरी मिळण्याची शक्यता नाही असं सांगत या युवकाने त्याचे हायस्कूल आणि महाविद्यालयातील शैक्षणिक सर्टिफिकेट जाळून टाकले आहेत. शिलरतन बोध असं या युवकाचं नाव आहे. 


मैनिपुरी जिल्ह्यातील करहरमध्ये राहणारा शिलरतन बोध हा युवक एक कम्युटर सेंटर चालवतो. अखिलेश यादव सत्तेत आले तर आपल्याला सरकारी नोकरी मिळेल अशी त्याला आशा होती. पण आता भाजप पुन्हा एकदा सत्तेत आलं आहे. त्यामुळे पुढची पाच वर्षे तरी नोकरी मिळण्याची आशा नसल्याचं तो म्हणाला. पाच वर्षांनतर आपलं वय वाढून सरकारी नोकरी मिळवण्यासाठी अपात्र ठरु असं म्हणत त्याने त्याच्या शैक्षणिक कागदपत्रांची होळी केली. 


शिलरतन बोध याला त्याच्या लहान भावाचीही काळजी आहे. 26 वर्षाचा त्याचा लहान भाऊ हा सरकारी नोकरीसाठी धडपडतोय, पण त्याला अद्याप यश मिळालं नाही. अखिलेश यादव जर सत्तेत आले असते तर आपल्याला नोकरी मिळाली असती, पण आता ते शक्य नाही अशी खंत त्याने व्यक्त केली. या दोघांचेही अद्याप लग्न झाले नाही, ही वेगळीच चिंता त्यांच्यासमोर आहे. 


उत्तर प्रदेशमध्ये सरकारी नोकरी मिळणे ही प्रतिष्ठेची बाब समजली जाते. त्यामुळे दरवर्षी लाखो युवक केंद्रीय लोकसेवा आयोग आणि उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाची तयारी करताना दिसत आहेत. पण एखादा पक्ष सत्तेत आला किंवा एखादा पक्ष सत्तेत आला नाही, त्यामुळे आपल्याला सरकारी नोकरी मिळणारच नाही असा समज करत या पठ्ठ्याने थेट आपले शैक्षणिक सर्टिफिकेटच जाळून टाकले आहेत. 


महत्त्वाच्या बातम्या: